जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळ, कृष्णापुरी यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या उपोषणास यश

जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळ, कृष्णापुरी यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या उपोषणास यश.

जळगाव – चांदवड महामार्गावर भारत डेअरी स्टॉप ते पांडव नगरी पर्यंत शहरातील चौकात तसेच महामार्गाला जे-जे उपरस्ते मुख्य शहरात किंवा कॉलनी मध्ये जाण्यासाठी जोडले आहेत अशा ठिकाणी गतिरोधक तातडीने बसवावे व खालील प्रमुख मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात या संदर्भात जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळाचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आज पार पडले. महामार्गावरील वाढती रहदारी व त्यामुळे होणारे अपघात यांच्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अनेकांचे अपघातात प्राण गेले आहे व अनेक कर्त्या तरुणांना आपला जीव यात गमवावा लागला आहे.या विषयासंबंधी अगोदर ही अनेक मागण्या तसेच निवेदने प्रांताधिकारी कार्यालय, पाचोरा व सार्वजनिक बांधकाम विभागात दिली गेली परंतु यावर कोणत्याही स्वरूपाची अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळाने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारले होते. उपोषणास वैशाली ताई सुर्यवंशी,संजय नाना वाघ, अमोल भाऊ शिंदे,मा.आमदार किशोर अप्पा पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दिला, तसेच मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड,एकता ऑटो रिक्षा युनियन या संघटनांनी पाठिंबा दिला. कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, धुळे यांनी उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांना दिलेल्या पत्रानुसार मंडळाच्या सर्व मागण्या पत्रात नमुद केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारचे पत्र दिले, तसेच या पत्राचा संदर्भ घेऊन मा.आमदार किशोर अप्पा पाटील यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्या अशी विनंती केली त्यानुसार मा.जिल्हाधिकारी साहेबांनी येत्या आठ ते पंधरा दिवसांत यावर अंमलबजावणी करु असे ठोस आश्वासन मा.आमदारसाहेबांना दिले त्यानुसार मंडळाच्या सर्व सदस्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
प्रमुख मागण्या.
१) जळगाव – चांदवड महामार्गावर तातडीने गतिरोधक बसवावे.
२) गतिरोधक बसवितांना ते वाहतूक नियमाप्रमाणे असावे, त्यावर कलरचा पट्टा व चमकणारे स्टिकर लावले जावे जेणेकरून वाहनचालकांना रात्री लांबुन दिसण्यास मदत होईल.
३) महामार्गावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.
४) महामार्गावरील पथदिवे रात्रीच्या वेळी नेहमी चालु असावे.