सोयगाव–शेंदुर्णी रस्ता बनला मृत्यूचा सापळा!
खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; ‘खड्डे बुजवा, रस्ता बनवा’ची जोरदार मागणी.
प्रतिनिधी / सोयगाव
सोयगाव–शेंदुर्णी मार्गावरील खड्ड्यांनी आता रस्ताच गिळंकृत केला आहे. इतके की, “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?” असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. दररोज हजारो वाहनधारक या मार्गावरून प्रवास करतात; मात्र त्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
सोयगाव तालुका छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असून सुमारे सात किलोमीटरचा हा रस्ता तीन की. मी. चांगल्या अवस्थेत आहे. त्यातील तीन किलोमीटरचा भाग छ. सभाजीनगर जिल्ह्यात येतो आणि हा भाग विशेषतः खड्यांनी व पूर्ण रस्त्याची चाळणी झाली आहे. आहे. अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्त न झाल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत.
सध्या दिवाळी व भाऊबीज सणामुळे वाहतुकीचा मोठा ओघ वाढला आहे. लाडक्या बहिणी सोयगावला येत असून त्या हळहळ व्यक्त करत आहेत — “देवा, भाऊ मुख्यमंत्री आमचे महिन्याचे 1500 रुपये नको, पण आमचा सोयगाव–शेंदुर्णी रस्ता तरी चांगला करून द्या!” अशी आर्त विनंती त्या करताना दिसत आहे.
या रस्त्यावरून शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, तसेच रुग्णवाहिका वाहतूक करतात. पण रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याचे रूपांतर दलदलीत होते. परिणामी वाहनांचे नुकसान तर होतेच, पण वाहनचालकांना पाठीच्या व मणक्याच्या दुखण्याचा त्रासही वाढला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार “लवकरच दुरुस्तीचे काम सुरू होईल” अशी आश्वासने मिळत असली तरी प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. नागरिकांच्या तक्रारी असूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येतो. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कामे दाखवली जातात, पण प्रत्यक्षात रस्ता जसाच्याचा तसाच राहतो.
संतप्त नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. “खड्डे बुजवा, रस्ता बनवा!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. नागरिकांचा सवाल आहे — “सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी या रस्त्याने कधी प्रवास करतात का? की ते फक्त हेलिकॉप्टरनेच फिरतात?”
आता तरी प्रशासनाने आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी निवडणुकीच्या भाषणांच्या पुढे जाऊन नागरिकांच्या जीवाशी निगडित या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी जनतेची ठाम मागणी आहे. अन्यथा पुढील काही दिवसांत तीव्र आंदोलन पेट घेईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
























