“सप्तरंग-2025” : ग्रामीण पोलिसांकडून राज्यात प्रथमच रिल्स स्पर्धा!
तरुणांना ‘Say to No Drugs’ संदेश, महिलांना सशक्तीकरणाची प्रेरणा!
छत्रपती संभाजीनगर दत्तात्रय काटोले | 29 सप्टेंबर 2025:
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या वतीने राज्यात प्रथमच “सप्तरंग-2025” या राज्यस्तरीय शॉर्ट रिल्स स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. “Say to No Drugs” आणि “महिला सशक्तीकरण” या दोन विषयांवर आधारित या उपक्रमाला तरुणाईकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक डॉ. अन्नपूर्णा सिंह यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा उपक्रम, ग्रामीण पोलिसांकडून राज्यस्तरावर प्रथमच राबवण्यात आला. सोशल मीडियाच्या प्रभावी माध्यमाचा उपयोग करून समाजातील तरुणांना अंमली पदार्थांविरोधात सजग करण्याचा आणि महिलांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.
स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातून तब्बल 103 शॉर्ट रिल्स प्राप्त झाल्या. यातील 20 रिल्स शॉर्टलिस्ट करून अंतिम फेरीसाठी 6 उत्कृष्ट रिल्सची निवड करण्यात आली. आज दुपारी एम.जी.एम. कॅम्पस येथील रुक्मिणी हॉलमध्ये पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक मा. वीरेंद्र मिश्र, तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री मा. संजय शिरसाठ उपस्थित होते.
विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:
🔹 अंमली पदार्थ व व्यसनमुक्ती विषय:
प्रथम: संस्कार – ऋतुजा सूर्यवंशी (₹21,000)
द्वितीय: विरासत – सचिन अनार्थे (₹11,000)
तृतीय: दुर्गा – प्रसाद वाघमारे (₹7,000)
🔹 महिला सशक्तीकरण विषय:
प्रथम: वीट – शरयू टरघळे (₹21,000)
द्वितीय: ग्लानिर्भवति – सचिन दांडगे (₹11,000)
तृतीय: महिला सशक्तीकरण – ऋतुजा घोडतुरे (₹7,000)
याशिवाय उत्कृष्ट दिग्दर्शन, संकलन, अभिनय, छायाचित्रण अशा विविध तांत्रिक विभागांतील कामगिरीसाठी विशेष पुरस्कार देण्यात आले.
पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले:
“व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी कायदेशीर कारवाई पुरेशी नाही. तरुणांनी स्वतःला ‘नाही’ म्हणण्याची ताकद मिळवावी, महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करावी, हाच ‘सप्तरंग’ उपक्रमाचा हेतू आहे.”
पालकमंत्री मा. संजय शिरसाठ यांचे उद्गार:
“आजची तरुणाई अत्यंत सर्जनशील आहे. सोशल मीडियासारख्या माध्यमातून त्यांनी समाज परिवर्तनाची जबाबदारी घेतली, ही अतिशय सकारात्मक बाब आहे.”
या उपक्रमाचे नियोजन पोलीस उपअधीक्षक गौतम पातारे, रा.पो.नि. अण्णासाहेब वाघमोडे, स.पो.नि. सरला गाडेकर, प्रदिप भिवसने, पोलीस कर्मचारी जितेंद्र बोरसे व प्रसाद वाघमारे यांच्यासह संपूर्ण पोलिस दलाने केले. सूत्रसंचालन सदाम शेख यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक डॉ. अन्नपूर्णा सिंह यांनी सर्व मान्यवरांचे आणि सहभागीं चे आभार मानले.