बनोटी (ता. सोयगाव) येथे फिरते लोक अदालत व कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न.

बनोटी (ता. सोयगाव) येथे फिरते लोक अदालत व कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न.

 

दत्तात्रय काटोले/सोयगाव

 

सोयगाव प्रतिनिधी (20 सप्टेंबर 2025): तालुका विधी सेवा समिती व सोयगाव वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने बनोटी येथील चौकी परिसरात फिरते मोबाईल व्हॅनद्वारे लोक अदालत व कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम सोयगाव येथील दिवाणी न्यायाधीश मा. एस. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडला.

या शिबिरात दिवाणी स्वरूपाची दोन व फौजदारी स्वरूपाची एक अशी एकूण तीन प्रकरणे स्थळीच निकाली काढण्यात आली. यामुळे नागरिकांनी थेट न्याय मिळवला आणि वेळेची व पैशांची बचत झाली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोयगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेश आर. गिरी व ज्येष्ठ अ‍ॅड. आर. आर. महाजन हे उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. एस. ए. व्ही. जाधव यांनी कायदेविषयक विविध मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले. विशेषतः महिलांवरील अत्याचार व ‘पोक्सो’ कायद्यावर त्यांनी प्रभावीपणे भाष्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. एस. पी. सूर्यवंशी यांनी केले. यावेळी गावाचे सरपंच मुरली बापू, माजी सरपंच धनंजय पाटील, ग्रामविकास अधिकारी शेजुळ, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलिस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी तसेच महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामविकास अधिकारी शेजुळ, माजी सरपंच धनंजय पाटील, पोलिस उपनिरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. न्यायालयीन कर्मचारी कुरकुटे (लिपिक), तोगल, ताडे, मेहेर (शिपाई), नाझर इत्यादींनी कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले.