अतिवृष्टीने कपाशीची कैऱ्या सडली; बळीराजाचे स्वप्न धुळीला
( प्रतिनिधी, सोयगाव दत्तात्रय काटोले )
सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा बळीराजावर संकट ओढवले आहे. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिपक्व अवस्थेत असलेल्या कपाशीच्या कैऱ्या सडू लागल्या आहेत. खरिपातील शेवटचा घास हातात येण्याआधीच निसर्गाने हिसकावून नेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूचा पूर आला आहे.
गत काही दिवसांपासून तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. परिणामी, मका, सोयाबीन, भुईमूग, उडीद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी नुकतीच सुगणी आलेली मका मोडून जमा करता येत नाही कारण पाऊस चालू आहे.
कपाशीच्या कैऱ्या सडत असल्याचे चित्र सेवा परिसरात पाहायला मिळत आहे. शेतीचा हंगाम भरात असतानाच अवकाळी पावसाने फळबागा आणि पिके उध्वस्त केली आहेत. ज्या वेळेस पिकांना पावसाची गरज होती, तेव्हा त्याने दडी मारली, आणि आता परतीच्या पावसाने एकच तांडव घातले आहे.
शेतकऱ्यांच्या पदरात उरले अश्रूंचे थेंबच
या अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या डोळ्यातील स्वप्नच नव्हे तर शेतात उभी असलेली मेहनतीची पिकेदेखील वाहून नेली आहेत. ढगफुटीमुळे नद्या, नाले तुडुंब भरले असून शेतीमध्ये पाणीच पाणी झाले आहे. काही भागांत तर शेतीची जमीनही नष्ट झाली आहे.
गतवर्षीच्या अल्प पावसाने पिके तोकडीच आली होती, यंदा सुरुवातीला पावसाने दिलासा दिला आणि शेतकरी आशावादी झाला होता. मात्र आता हे सारे स्वप्न भंगले आहे. अवघ्या काही तासांत उभं खरिपाचं भविष्य मातीमोल झालं आहे.
या गावांमध्ये मोठे नुकसान
जरडी, निंबायती, निम खेडी, घोसला, बनोटी, गोंदेगाव, सोयगाव, गलवाडा व वाडी या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांचे पीक डोळ्यादेखत नष्ट झाले आहे. महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, सोयगाव तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
शासनाने या आपत्तीमुळे बाधित पिकांसाठी भरपाई जाहीर केली असली, तरी ती वेळेवर मिळावी, अशी आर्त अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पाच दिवसांचा आणखी धोका
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशांत महासागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगांचा प्रवास भारताच्या दिशेने होत असून, १० ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान अभ्यासक यांनी व्यक्त केला आहे.
बळीराजाला सावरण्यासाठी सरकारने तातडीने मदतीचा हात द्यावा!
अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. फक्त आश्वासनांवर नाही, तर कारवाईवर विश्वास हवा, ही भावना सध्या संपूर्ण तालुक्यात उमटत आहे.