धबधबा झाला रौद्र, शेतीची अवस्था बेजार : फर्दापूर-अजिंठा परिसरात मुसळधार पावसाने थैमान
सोयगाव दत्तात्रय काटोले
दि. २२ रोजी जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आणि फर्दापूर सोयगाव व वाडी गलवाडा परिसरात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सोमवारी सकाळपर्यंत अक्षरशः हाहाकार माजवला. निसर्गाच्या या कोपामुळे सप्तकुंड धबधबा रौद्र रूपात कोसळू लागला असून, परिसरातील नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी, वाघुर नदीच्या पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
सप्तरंगी सौंदर्याचं रौद्र रूप
अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा पावसामुळे प्रचंड वेगाने कोसळत असून, त्याचा आवाज आणि जलप्रवाह पाहून निसर्गाचा रौद्रपणा स्पष्टपणे जाणवत आहे. पावसाळ्यात धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते, मात्र सोमवारी अजिंठा लेणी बंद असल्याने अनेक पर्यटक या अद्वितीय दृश्यापासून वंचित राहिले.
शेतीचे मोठे नुकसान
वाघुर नदीला आलेल्या पूरामुळे परिसरातील कापूस, मका आणि मोसंबी यांसारख्या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण शिवार पाण्याखाली गेले असून, आर्थिक संकट गडद झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी प्रशासनाकडे केली आहे. मात्र, अद्याप नुकसानीचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही.
सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
सध्या अजिंठा व सोयगाव तालुका व परिसरात निसर्गसौंदर्य आणि आपत्ती यांचा दुहेरी अनुभव नागरिक घेत आहेत. प्रशासनाकडून पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदी-ओढ्यांच्या काठावर जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
निसर्गाच्या सौंदर्याला साक्ष देताना, त्याच्या रौद्र रूपालाही सामोरे जाण्याची वेळ सध्या फर्दापूर-अजिंठा परिसरावर आली आहे. प्रशासनाने योग्य वेळी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे.