निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
पाचोरा:- निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 10 जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. संपूर्ण परिसरात सणासारखा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या खास दिवशी शाळेच्या आवारात ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक औक्षण आणि फुलांच्या वर्षावात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात रंगीबिरंगी फुग्यांची सजावट करून संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि उत्साहाने परिसर अधिकच उजळून गेला.
विद्यार्थ्यांचे विशेष मनोरंजन करण्यासाठी डोरेमॉन, मोटू-पतलू यांसारख्या लोकप्रिय व्यक्तिरेखांचे जीवंत सादरीकरण करण्यात आले होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले. फुग्यांमध्ये खेळणारे, स्मितहास्य करत शाळेच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणारे हे विद्यार्थी पाहून पालकांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. शाळेच्या दर्शनी भागात लावलेल्या स्वागत फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या प्रसंगी शाळेचे सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शाळेचे प्राचार्य श्री गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी श्री. आय.बी.सिंग,उपप्राचार्य श्री.प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ.स्नेहल पाटील,प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील, पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख फरीदा भारमल, सौ. वर्षा पाटील यांच्यासह संपूर्ण शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या नेतृत्वाने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी घेतलेला पुढाकार आणि प्रेमळ वातावरण पाहून पालक वर्गाने समाधान व्यक्त केले.
शाळेच्या या आगळ्या वेगळ्या स्वागत पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला असून त्यांच्या आनंदी सुरुवातीला एक सुंदर सुरसंगती लाभली आहे.