निलंबित आरोपी पोलिसाने रुग्णालयातच जिल्हा पोलीसांच्या हातावर तुरी दिल्या आणि पसार झाला, पुन्हा दोन पोलिस निलंबित झाले अन् पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) सुनिल उत्तम लोखंडे (पोलिस दलातील बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक) (वय ५२) राहणार वानवडी,जिल्हा पुणे याने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या यांच्या मुलांना रिव्हाल्वरचा धाक दाखवून दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ रोजी डांबून ठेवले होते.व त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावले होते.मुलांची सुटका करण्यासाठी श्रीरामपूर विभागाचे तत्कालीन विभागीय पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके हे आले असता त्यांच्या वर ही आरोपीने गोळीबार केला होता.आणि तेव्हा ते थोडक्यात बालंबाल बचावले होते.या बाबत राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा ही दाखल करण्यात आला होता.आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल लोखंडे यांची काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र पोलिस दलातून हकालपट्टी केली होती. आरोपी सुनिल लोखंडे हा पुर्वी पुणे पोलीस दलात सेवेत असताना त्यांच्या विरोधात शिरूर पोलिस स्टेशनमध्ये दोन खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.एका गुन्ह्यातील सहभाग बद्दल त्याला न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षाही सुनावली होती.हाच लोखंडे आरोपी असलेल्या एका गुन्ह्यात त्याला ३०७ या कलमाखाली शिक्षा झाली होती आणि तो अहिल्यानगर येथील जिल्हा सबजेल कारागृहात शिक्षा भोगत होता.सहा दिवसांपूर्वी त्याला अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात मुत्राशयाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीसांची नजर चुकवून तो पसार झाला होता.या मुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस दलाची लक्तरे वेशीवर टांगून संपूर्ण महाराष्ट्रात नगर पोलीसांची नाचक्की झाली आहे.यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतच चालला आहे.जिल्ह्यातील जामखेड आणि नगर शहरातील तपोवन परिसरात गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच आता पुन्हा जिल्हा रुग्णालयातून पोलीसांच्या तावडीतून आरोपी पसार झाला आहे. पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळून गेल्या प्रकरणी नगर मधिल तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम २६२ अन्वये मंगळवारी रात्री उशिरा पोलिस अंमलदार संजय वाघमारे यांनी गुन्हा दाखल केलेला आहे.अहिल्यानगर येथे नव्याने बदलून आलेले जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्हा पोलिस मुख्यालयातील पोलिस अंमलदार संजय किसन वाघमारे आणि योगेश यशवंत दायजे या दोन पोलिसांना निलंबित केले असल्याची माहिती दिली आहे. कारण या दोघांना लोखंडे उपचार घेत असलेल्या ठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते.त्यांच्या हलगर्जीपणा मुळे आरोपी लोखंडे हा पोलीसांच्या तावडीतून पसार झाला आहे. दरम्यान आरोपी सुनिल लोखंडे हा पोलीसांच्या तावडीतून पसार झाल्याची माहिती मिळताच तोफखाना पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आनंद कोकरे आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस पथक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.पोलीस उप अधिक्षकावर गोळ्या झाडल्या प्रकरणी आरोपीवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.त्या घटनेनंतर त्याला बेड्याही ठोकल्या होत्या.१० जून२०२५ रोजी जिल्हा रुग्णालयातून पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या या आरोपी सुनिल लोखंडे बाबद प्रतिक्रिया देताना जिल्हा नियोजन मंडळाच्या माजी सदस्या सौ वैशालीताई नांन्नोर म्हणाल्या की पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला सराईत गुन्हेगार लोखंडे हा खाक्या वर्दीतील गुंडच आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे पोलीस महासंचालक साहेब यांनी या प्रकरणी लक्ष घालून फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या पाहीजेत तरच पोलिस खात्याची महाराष्ट्रात शान राहील. या घटनेमुळे सर्व सामान्य लोकांचा पोलीसांच्या कार्यपद्धती वरील विश्वासच उडाला आहे.पोलीसांचा छुपा पाठिंबा असल्या शिवाय असले प्रकार होणारच नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. लवकरात लवकर फरार आरोपीच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या तरच जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील नाही तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही.अहिल्यानगर जिल्ह्यातील विनापरवाना गावठी कट्टे जवळ बाळगणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत कठोर कारवाई करावी अशी मागणी ही सौ.नान्नोर यांनी केली आहे.