अंकुर सीडस कंपनीचे स्वदेशी 5 हे वाण खरेदी न करण्याचे आवाहन

अंकुर सीडस कंपनीचे स्वदेशी 5 हे वाण खरेदी न करण्याचे आवाहन

जळगाव, दि. 24  : चाळीसगाव तालुक्यात गुणनियंत्रणसाठी तालुकास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. चालू खरीप 2023 या हंगामात अंकुर सीडस कंपनीचे स्वदेशी 5 हे वाण बिजोत्पादन होऊ न शकल्याच्या कारणाने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे स्वदेशी 5 चे बियाणे बाजारात मिळाले तर ते बनावट असेल, त्यामुळे ते खरेदी करू नये. असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आल्याचे चाळीसगाव तालुका कृषि अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
खरीप हंगामासाठी बी टी संकरित कापसाच्या बीजी-1 वाणांसाठी प्रति पाकीट 635 रुपये तर बीजी-2 वाणासाठी प्रति पाकीट 853 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. खरीप हंगाम 2023 अंतर्गत कापूस बियाण्याचा संभाव्य 63 हजार 724 हेक्टर क्षेत्रासाठी 3 लाख 18हजार 620 कापूस बियाणे पाकिटाची मागणी नोंदविण्यात आली आहे. कापूस बियाणे पुरेस उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना कमतरता भासणार नाही. शेतकरी बांधवानी अधिकृत कृषि केंद्रातून रीतसर पक्के बिल घेऊन बियाणे खरेदी करावे. जादा दराने बियाणे विक्री होत असल्यास तालुका कृषि अधिकारी, चाळीसगाव किंवा कृषि अधिकारी पंचायत समिती, चाळीसगाव यांच्याकडे संपर्क साधून तक्रार करावी. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कापूस बियाणे लागवड 1 जून 2023 पासून करावी, असे आवाहन कृषि अधिकारी, पंचायत समिती, चाळीसगाव यांनी केले आहे.
चाळीसगांव तालुक्यासाठी खरीप हंगाम 2023 साठी युरिया 12 हजार 188 मे.टन., सिंगल सुपर फॉस्फेट 5 हजार 75 मे.टन, पोटॅश 2 हजार 498 मे.टन, एन.पी.के संयुक्त खते 9 हजार 413 मे.टन या सर्व खतांची एकूण 29 हजार 174 मे.टन याप्रमाणे खतांचा पुरवठा टप्प्याटप्याने खरीप हंगामात होणार आहे. चाळीसगांव तालुक्याचा 1 एप्रिल 2023 रोजीचा शिल्लक खत साठा युरिया 3 हजार 941 मे.टन, सिंगल सुपर फॉस्फेट 1 हजार 293 मे. टन, पोटेंश 70 मे.टन, एन.पी.के. संयुक्त खते 3 हजार 181 मे.टन.आहे. शेतकरी बांधवांनी अधिकृत खत विक्री केंद्रातून आधार कार्ड व अंगठा देऊन ई-पॉस मशीनव्दारे खते खरेदी करावी. तसेच खते खरेदीचे खत विक्री केंद्रातून रीतसर पक्के बिल घ्यावे. असे आवाहन गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा कृषि अधिकारी पंचायत समिती, चाळीसगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.