शिक्षकांचे वेतन, शाळांचे अनुदान, प्रलंबित बिले निकाली काढणार आ.सत्यजीत तांबे

शिक्षकांचे वेतन, शाळांचे अनुदान, प्रलंबित बिले निकाली काढणार आ.सत्यजीत तांबे

प्रतिनिधी,

आमदार सत्यजीत तांबे आमदार म्हणून निवडून आल्यापासून शिक्षण क्षेत्रातील कामाला गती मिळाली आहे. धुळे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागातील विविध प्रश्नांसंदर्भात सोमवारी बैठक पार पडली. १५ कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याला शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी आणण्याचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम प्रशासनाने हाती घेतला आहे. शिक्षणाधिकारी व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या बैठकीत शिक्षण विभागातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. शिक्षण विभागातील कामे लवकरात लवकर मार्गी लागतील, असा विश्वास आ. तांबे यांनी बैठकीनंतर व्यक्त केला.

धुळे जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदींचे अनेक प्रश्न दीर्घ काळापासून प्रलंबित होते. त्यात प्रामुख्याने २०, ४० व ६० टक्के अनुदानाचे वितरित होण्याबाबतचे आदेश निघावा. २० टक्के शालार्थ आयडी प्रस्ताव, एटीडी ते येवो पदोन्नती, डी.एड ते बी.एड मान्यता, शिक्षकांना शाळा बाह्य कामे न देणे, शाळांचे वेतन बंद असणे, वेतन पथकाशी संबंधित प्रश्न, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक मान्यता आदी प्रश्नांवरही चर्चा झाली. याप्रसंगी बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, शिक्षणाधिकारी प्रवीण देसले, मोहन देसले, शिक्षण समितीचे सभापती महावीरसिंग रावळ, शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे आदींची उपस्थिती होती.

चौकट

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न

१. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना बीएलओ मतदान नोंदणी अधिकारी म्हणून कायमस्वरुपी काढून घेण्यात यावे.
२. प्रा. शिक्षकामधून सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मुख्याध्यापक पदी नियुक्ती करणे.
३. शासनाची मान्यता येत नाही, तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात पदवीधर प्रशिक्षित शिक्षकांमधून केंद्र प्रमुखांची नियुक्ती करणे
४. पदोन्नती मुख्याध्यापकांकडून सेवा ज्येष्ठतानुसार शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर बढती मिळणे.
५. ७ वा वेतन आयोगाचा अद्याप फक्त पहिलाच हप्ता प्राप्त असून उर्वरित हफ्ते शिक्षकांच्या भविष्य निधीच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावे.

प्रलंबित प्रश्न लवकरच सुटतील

धुळे जिल्ह्यातील शिक्षणाच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घ काळापासून प्रलंबित होते. आज शिक्षणाधिकारी आणि शिक्षण संघटना पदाधिकारी यांच्यासह झालेल्या बैठकीत या सर्वच प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. यापैकी अनेक प्रश्न लवकरच सुटतील, असा विश्वास मला वाटतो.
– आमदार सत्यजीत तांबे.