पाचोरा मराठा महासंघ तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पाचोरा मराठा महासंघ तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
———————————————
पाचोरा येथील गुणगौरव सोहळ्यात
88 शाळेतील विद्यार्थ्यांचा सन्मान
————————————————
जिजाऊ जन्मोत्सव स्पर्धेचा गुणगौरव सोहळा उत्साहात
———————————————–

पाचोरा – येथील अखिल भारतीय मराठा महासंघ व महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिजाऊ जन्मोत्सव स्पर्धेतील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. दिनांक 14 जानेवारी 2023 शनिवार रोजी शहरातील स्वर्गीय राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये संपन्न झालेल्या या गुणगौरव सोहळ्यात तालुक्यातील 88 शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांना गौरवण्यात आले.

सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. एस. डी. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या गुणगौरव सोहळ्याला मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बी. बी. भोसले, चाळीसगावचे अध्यक्ष खुशाल बीडे, पाचोरा तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष सुनील देशमुख, सरचिटणीस राहुल बोरसे, तालुका कार्याध्यक्ष संजय एरंडे, युवक तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, युवक शहराध्यक्ष प्रवीण पाटील, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष किरण पाटील,गोराडखेडा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत पवार, मुख्याध्यापक सु.ना. पाटील, पत्रकार नंदू शेलकर, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमांच्या आरंभी उपस्थित मान्यवरांचा मराठा महासंघातर्फे सत्कार करण्यात आला. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात जिजाऊ जन्मोत्सव स्पर्धेचे उद्देश व्यक्त करून सहभागी शिक्षक व शाळांचे ऋण व्यक्त केले. जिजाऊ जन्मोत्सव स्पर्धेअंतर्गत विशेष प्राविण्य प्रदर्शित करणारे एकपात्री प्रयोग व वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धकांना यावेळी आपले अभिनय आणि वक्तृत्व कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. एस. डी. थोरात यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मनोगत व्यक्त करताना मोबाईलचा दुरुपयोग व सदुपयोग याबाबत चपखल मार्गदर्शन केले. मराठा महासंघाचे सरचिटणीस राहुल आप्पा बोरसे यांनी उपस्थित त्यांचे आभार प्रकटन केले.

जिजाऊ जन्मोत्सव स्पर्धा अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत 32 शाळा, एकपात्री प्रयोगात 27 शाळा, वक्तृत्व स्पर्धेत 18 शाळा, आणि निबंध स्पर्धेत 11 शाळांनी सहभाग नोंदवला. या सर्व शाळांमधील प्रथम तीन क्रमांकाने तालुकास्तरावर आलेल्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र, तर तालुका स्तरातून निवडण्यात आलेल्या प्रत्येक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय,आणि उत्तेजनार्थ बक्षीस पटकावणाऱ्या विद्यार्थ्याला आकर्षक स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच ही स्पर्धा यशस्वी करणाऱ्या शिक्षकांना “कृतिशील शिक्षक” हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख विनोद पाटील, उपप्रमुख ज्ञानेश्वर पाटील, प्रकल्प कार्यवाह चंद्रकांत पाटील, तसेच सदस्य प्रा. रवींद्र चव्हाण, गुणवंत पवार, अरुणा उदावंत, सुवर्णा पाटील, सीमा पाटील, पंकज देठे, अभिजीत पाटील, ज्ञानेश्वर पाटील व नंदू शेलकर यांनी मोलाची भूमिका बजावली. या गुणगौरव सोहळ्याला शितल अकॅडमी व दिशा डेंटल केअर पाचोरा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर निंभोरीकर, सचिन पाटील, राहुल महाजन, रवी ठाकूर, अनिल भोई, समाधान पाटील, अमृत पाटील, चेतन पाटील, प्रेमराज पाटील, अक्षय देशमुख, किशोर बावचे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील सर व सुवर्णा पाटील मॅडम यांनी केले