पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

  1. पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. ३१ : पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती.
आजपर्यंत राज्यात तब्बल एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील चोवीस तासात 7 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरला आहे. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबींमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.