पाचोरा पालिकेवर रस्त्यांच्या मागणीसाठी शेकडो नागरीक धडकले

पाचोरा पालिकेवर रस्त्यांच्या मागणीसाठी शेकडो नागरीक धडकले

(प्रशासकांशी चर्चा व निवेदन, आंदोलनाचा इशारा)

पाचोरा पालिकेवर शहराच्या विविध भागातील रस्त्यांच्या कामांच्या मागणीसाठी सोमवार दिनांक 15 रोजी सकाळी शेकडो नागरिक पालिकेवर धडकले. मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांच्याशी संतप्त भावनेने चर्चा करून आंदोलनाचा गर्भित इशारा देणारे निवेदन देण्यात आले. रस्त्याची कामे करून न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असेल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला.
निवेदनाचा आशय असा की, शहरालगत वसलेल्या, शहराचे वैभव व पालिकेचे उत्पन्न वाढविणाऱ्या अनेक नागरी वसाहतीं मध्ये विविध समस्यांचा सामना करत वास्तव्य करावे लागत आहे. वसाहतींमधील रस्त्यांची अवस्था जीवघेणी झालेली आहे .भुयारी गटारीचे काम अजून पूर्णत्वास आलेले नाही. या कामासाठी खोदण्यात आलेले रस्ते काही ठिकाणी तयार करण्यात आले. काही रस्त्यांची डागडूजी करण्यात आली तर काही भागातील रस्ते जैसे थे आहेत. शहरा लगतच्या उच्चभ्रू, नोकरदार ,व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांचा रहिवास असलेल्या प्रभाग 9 मध्ये रस्ते कामाला मंजुरी मिळाली असली तरी या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून रहिवाशांच्या जीविताशी खेळ खेळला जात आहे. या भागातील रहिवासी पालिकेचे सर्व कर वेळेवर व नियमित भरत असताना शहरात इतरत्र रस्त्यांची व इतर विकास कामे होत असताना प्रभाग 9 मध्ये मात्र कामे का केली जात नाहीत ? याचा पालिका प्रशासनाने खुलासा करावा. रिलायन्स पेट्रोल पंप ते जुना अंतुर्ली रस्ता हा अनेक वसाहतींना जोडणारा मुख्य व वर्दळीचा रस्ता असून मागणी करूनही या रस्त्याचे काम पूर्ण केले जात नाही. गाडगेबाबा नगर ,तक्षशिला नगर, विकास कॉलनी, भास्कर नगर ,कालिका नगर, एमआयडीसी कॉलनी, तलाठी कॉलनी, शंकर आप्पा नगर, विवेकानंद नगर, गणेश कॉलनी ,लक्ष्मी अंगण, शाहूनगर, गोविंद नगरी यासारख्या अनेक वसाहतींमधील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. रस्त्यांची दुर्दशा झाल्याने अपघात व हानी नित्याची झाली आहे. पालिका प्रशासनाकडे अनेकदा कामांची मागणी केली परंतु पालिका त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही .पालिकेला कोणाच्या व किती अपघात आणि बळींची प्रतीक्षा आहे? नागरिकांच्या भावनांशी व जीविताची सुरू असलेला खेळ पालिका किती दिवस खेळणार आहे ? रस्त्यांची दुर्दशा, त्यामुळे होणारे अपघात,असुविधा यामुळे रहिवाशांची जीवित हानी झाल्यास पालिका प्रशासनावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असाही इशारा संतप्त नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे .
निवेदनावर शहरातील सुमारे 1300 रहिवाशांच्या सह्या असून या संदर्भातील समस्या व गाऱ्हाणे मांडण्यासाठी नगरसेवक तथा पालिकेचे गटनेते संजय वाघ, नगरसेविका रंजना भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी पालिकेत येऊन प्रशासक शोभा बाविस्कर यांच्याशी चर्चा करून संतप्त भावना व्यक्त केल्या. रस्त्यांची कामे करून मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवू नका ,न्याय द्या, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला. याप्रसंगी संजय वाघ, प्रकाश भोसले, सतीश चौधरी, बाळकृष्ण पाटील,नगरसेवक विकास पाटील ,मनीष बाविस्कर,डॉ. जयसिंग परदेशी,नितीन माने, ईश्वर महाले, घन:श्याम सूर्यवंशी, सतीश देशमुख,आर एस पाटील,आर डी पाटील, हिरामण काळे ,भास्कर पाटील, रामलाल ब्राह्मणे,शिवाजी पाटील,रामदास जाधव,भगवान पाटील,प्रा.माणिक पाटील,धर्मराज अहिरे,प्रज्ञानंद भिवसने,लक्ष्मणराव सागर,प्रल्हाद मिस्तरी,किशोर कोळी,व्यंकट बोरसे,पुरुषोत्तम वाणी,नवल पाटील,सुभाष गोसावी,जगदीश देसले,सुरेश पाटील,सतीश पाटील,सागर पाटील,बाबूलाल पाटील,अनिल जाधव,सुनील पाटील,रावसाहेब पाटील,रामदास जाधव,भगवान पाटील,किशोर कोष्टी,कमलेश वारुळे,प्रा बी एम निकम,सुदर्शन सोनवणे,उज्वल पाटील ,प्रा के एस इंगळे,मयूर देवरे,गौरव शिरसाठ,
दीपक ब्राम्हणे,निलेश पाटील,हरीश पाटील,युवराज भोई,जय सुतार,हेमंत पाटील, व्ही एन पाटील,भावेश चव्हाण आदि उपस्थित होते.
रस्त्यांची कामे व इतर सुविधांच्या मागणीसाठी पालिकेवर धडकलेल्या नागरिकांनी शोभा बाविस्कर यांना यांच्याशी चर्चा करून कामे कधी होणार असा जाब विचारला असता येत्या दोन महिन्यात सर्व कामे पूर्णत्वास नेण्याचे बाविस्कर यांनी आश्वासन दिले. त्यामुळे आश्वासनाप्रमाणे कामे न झाल्यास पुढे कोणतीही मागणी न करता आंदोलन छेडण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी पालिका प्रशासनाची राहील असा गर्भित इशारा देण्यात आला आहे.