युवकांनी रक्तदानासाठी समोर यावे : ना. गुलाबराव पाटील

युवकांनी रक्तदानासाठी समोर यावे : ना. गुलाबराव पाटील

त्रिमुर्ती शिक्षण संस्थेत रक्तदान शिबिराचे आयोजन; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाचे भूमिपुजन

जळगाव, दि. ३ (प्रतिनिधी) : रक्तदान ही अतिशय आवश्यक अशी बाब असून यासाठी तरूणांनी पुढे यावे असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते त्रिमुर्ती शिक्षण समूहातर्फे आयोजीत रक्तदान शिबिराच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. गणेशोत्सवाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर यासोबत ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते याच कार्यक्रमात त्रिमूर्ती समूहाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा असणार्‍या भव्य क्रीडा संकुलनासह विविध उपक्रमांचे भूमिपूजन करण्यात आले. या क्रिडा संकुलनात क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो व बॅडमिंटन यासारख्या मैदानी खेळाचा समावेश आहे.

बांभोरी शिवारात असणार्‍या त्रिमुर्ती शिक्षण समूहातील विविध उपक्रमांचे आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. यातील सर्वात लक्षवेधी काम म्हणजे संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा असणार्‍या क्रीडा संकुलाचे भूमिपुजन होय. यासोबत नवीन मान्यता प्राप्त एम.फार्मसी महाविद्यालयाचे उद्घाटन गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व त्यांच्या स्वाक्षरी केलेल्या “सिग्नेचर बॅट” गुणवंतांना भेट देऊन सत्कार करण्यात आला. सुरुवातीला त्रिमूर्तींचा राजा श्री गणरायांची आरती मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

भव्य रक्तदान शिबिर

दरम्यान, त्रिमुर्ती शिक्षण संस्थेतर्फे गणेशोत्सव २०२२ निमित्त सदर महाविद्यालयात आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे देखील ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र रक्तसंकलन अधिकारी वीरभूषण पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी सहकार्य केले. यावेळी सुमारे १०१ बॅग रक्तसंकलन झाले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पंडित दामू पाटील, संस्थापक संचालक मनोज पाटील, संचालक विश्वनाथ रामदास पाटील , कवि प्रफुल्ल पाटील , नवलराजे पाटील, तिन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य, उप प्राचार्य , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते .

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन दिनेश पाटील सर यांनी केले.प्रास्ताविकात मनोज पाटील सर यांनी सुमारे २ कोटी निधीतून उभारण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय भव्य क्रिडा संकुला बाबत व इतर उपक्रमा विषयी माहिती विशद केली. कवि प्रफुल्ल पाटील यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्यासह मनोज पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. तर, आभार निलेश पाटील सर यांनी मानले.