मोंढाळे येथील जि. प. प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात
मोंढाळे (ता. पाचोरा) — जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोंढाळे येथे शुक्रवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता शालेय विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्यास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे तसेच लहान वस्तूंचे स्टॉल उभारले होते. पालक व उपस्थित नागरिकांनी या स्टॉलवरून खरेदी करून पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वस्तू खरेदी-विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. पालकांनी विद्यार्थ्यांना व्यवहार करताना प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र दिसून आले. सर्व विद्यार्थ्यांनी या बाल आनंद मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्यंकट बोरसे, पदवीधर शिक्षक श्री. राजेंद्र कोळी, श्री. रविंद्र कुंभार तसेच उपक्रमशील उपशिक्षिका श्रीमती मीना नेहरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापकांनी सहभागी विद्यार्थी व उपस्थितांचे आभार मानले.

























