जळगाव जिल्हा जागृत जनमंच ची आसनखेडा ता.पाचोरा येथे जनजागृती

जळगाव जिल्हा जागृत जनमंच ची आसनखेडा ता.पाचोरा येथे जनजागृती

पाचोरा येथे घरकुल पात्र लाभार्थी ऐवजी अपात्र लोकांना घरकुल देण्यात आले. पात्र लोकांना मात्र लटकत ठेवले असा गैरप्रकार पाचोरा जागृत जनमंचचे अध्यक्ष श्री. निळकंठ पाटील यांच्या लक्षात आला.
तेथील नागरिकांनी यासाठी जळगाव जिल्हा जागृत जनमंच ची बैठक बोलावली. आम्हाला आमच्या हक्काचे घरकुल मिळवून द्यावे अशी मागणी केली.
या बैठकीत शिवराम पाटील, निळकंठ पाटील, गुलाब पाटील यांनी माहिती जाणून घेतली. तसे निवेदन तयार करून नागरिकांच्या सह्या घेवून बीडीओ व सीईओ कडे रीतसर अपील करून घरकुल चा प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात केली आहे.
सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यात सुसंवाद नसल्याने ग्रामपंचायतचे कामकाज ठप्प झाले आहे. सदस्य पळवापळवी चे प्रकार घडल्याने लोक नागरी सुविधांपासून वंचित आहेत.
ग्रामपंचायत व ग्रामसभेची कार्यपद्धती बाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. सरपंच व सदस्यांच्या वादात ग्रामसेवक गैरफायदा घेत असेल तर सर्वच ग्रामस्थांनी निवडणुकीतील तेढ विसरून काम करण्याचे आवाहन शिवराम पाटील यांनी केले. तसेच कोणत्याही समस्यांबाबत निळकंठ पाटील व गुलाब पाटील आपणास मदत करतील. पाचोरा जागृत जनमंच हे नागरिकांच्या हक्काचे व्यासपीठ आहे.
राजकीय नेते आपल्या पक्षाच्या माध्यमातून समस्या सोडवण्याऐवजी समस्या निर्माण करतात. गावात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजतात. त्यात गावकरी आपल्या हक्कांपासून वंचित राहातात. म्हणून जागृत जनमंच नागरिकांच्या हक्कासाठी तालुका व जिल्हा स्तरावर मदत करील असे आश्वासन निळकंठ पाटील यांनी दिले. यासाठी गुलाब पाटील यांचा लढाऊ अनुभव कामी येईल.
या बैठकीचे आयोजन गावातील जाग्रुत नागरिक आबा पाटील, अशोक पाटील, शिवाजी पाटील, गौरव पाटील व कैलास गायकवाड यांनी केले होते. सुमारे ६० नागरिक याठिकाणी उपस्थित होते.
तसेच भडगाव जागृत जनमंचची जबाबदारी अध्यक्ष म्हणून श्री. अभिमनदादा हटकर व उपाध्यक्ष म्हणून श्री. सुभाष ठाकरे यांचेकडे सोपवण्यात आली.
जळगाव जिल्हा जागृत जनमंच मध्ये ज्ञान, काम आणि त्याग ही तीन सुत्रे वापरली जातात. कायद्याचे ज्ञान असणे, काम करण्यासाठी वेळ देणे व स्वखर्चाने काम करणे ज्याला शक्य असेल त्यांना सोबतच घेऊन यशस्वी मोहिम राबवली जात आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिक यात स्वेच्छेने सहभागी होत आहेत.
जिल्हा स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी एकत्रितपणे आंदोलन करण्याची तयारी श्री. निळकंठ पाटील यांनी केली आहे. त्यात आसनखेडा गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास ग्रामस्थांनी दिला.
आसनखेडा येथील मंदिरावर सकाळी ८-३० ते ११ या बैठकीत जेष्ठ नागरिक सोबत तरुण व शाळकरी मुले उस्फुर्तपणे सहभागी झाले होते. आजोबा, वडील अज्ञान राहिले म्हणून वंचित राहिले. आम्ही आता अज्ञान राहाणार नाही, असा त्यांचा निर्धार होता.