पाचोऱ्यात भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न
पाचोरा (प्रतिनिधी) – भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरात भव्य आणि उत्साहपूर्ण मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. गांधी चौक येथील जैन स्थानकापासून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली.
ही मिरवणूक गांधी चौक, रथ गल्ली, विठ्ठल मंदिर रोड, जामनेर रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, भुयारी मार्ग, भडगाव रोड मार्गे यशोदा नगर येथील जैन स्थानकापर्यंत पार पडली. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत करत पुष्पवृष्टी केली.
यावेळी जैन समाजातील बांधव, महिला, युवक तसेच बालगोपाळ यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
यशोदा नगर येथील जैन स्थानकात मिरवणुकीचा समारोप भव्य कार्यक्रमाने करण्यात आला. या कार्यक्रमात भगवान महावीर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला तसेच समाजातील ऐक्य आणि अहिंसेचा संदेश देण्यात आला.
या मिरवणुकीमुळे शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.






















