प्रा. सौ. जयश्रीताई वर्मा वाघ यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार जाहीर
पाचोरा : श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील प्राध्यापिका सौ. जयश्रीताई ओमप्रकाश वर्मा वाघ यांना ‘महाराष्ट्र रत्न’ हा मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या बहुआयामी, प्रेरणादायी व समाजाभिमुख कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ या कला, क्रीडा, रेकीआचार्य, अध्यात्म, शैक्षणिक, सामाजिक, समाजप्रबोधन, प्रभावी व्याख्यान तसेच आकाशवाणीवर त्यांच्या झालेल्या मुलाखतीचे प्रसारण झाले असून, त्या माध्यमातून मानसिक आरोग्य व सकारात्मक ऊर्जा याविषयी त जनजागृती , अशा विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असून त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ज्ञान, संस्कार, सेवा व सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम दिसून येतो. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम, मार्गदर्शन शिबिरे व जनजागृती कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन समाजमनावर सकारात्मक ठसा उमटवला आहे.
विशेष म्हणजे, त्या अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत त्यांना योग्य दिशा देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व वैयक्तिक आयुष्यात प्रगती साधली असून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ यांचे मोठे योगदान राहिले आहे.
ह्या पुरस्काराचे आकर्षण व विशेष म्हणजे हा पुरस्कार पंढरपूर येथील विठुरायाच्या पवित्र व आध्यात्मिक नगरीत प्रदान करण्यात येणार असून या भक्तिमय वातावरणात होणारा गौरव सोहळा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरणार आहे. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला अधिक व्यापक ओळख मिळणार आहे.
यापूर्वी नुकताच त्यांना राष्ट्रीय स्तरावर बेस्ट रिसर्च पेपर प्रेझेंटेशन मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले होते, आता हा महाराष्ट्र रत्न पुरस्कार त्यांना जाहीर झाल्यामुळे त्यांच्या या यशामुळे पुन्हा एकदा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.























