गॅस भाववाढ व काळाबाजाराविरोधात पाचोरा काँग्रेस आक्रमक
पाचोरा (प्रतिनिधी) – घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात तसेच गॅसच्या वाढत्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी पाचोरा तालुका काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. यावेळी तहसीलदार विजय बनसोडे यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली.
केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत असून, त्यातच पाचोरा तालुका व शहरात गॅस सिलिंडरचा काळाबाजार वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार विजय बनसोडे यांनी संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनात तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, जिल्हा चिटणीस शेख इरफान शेख मन्यार, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शरीफ शेख, युवक काँग्रेसचे संदीप पाटील, एस.सी. सेलचे शंकर सोनवणे, प्रवीण पाटील, अण्णा पाटील, ओबीसी सेलचे चेतन बोदवडे, प्रशांत पाटील, जुगराज भोई, भगवान भोई, राहुल मराठे, दिलदार पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























