सोयगावमध्ये स्वच्छतेचा बोजवारा — आठ दिवसांपासून कचरा न उचलल्याने नागरिक त्रस्त

कर्मचाऱ्यांचा पगार न झाल्याने कामबंद आंदोलन; रस्त्यावर कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि रोगराईचा धोका
वार्ताहर : दत्तात्रय काटोले, सोयगाव
सोयगाव : नगरपंचायत क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून स्वच्छतेची कामे ठप्प पडल्याने शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घंटागाड्या बंद असून रस्त्यांवर, घराघरासमोर कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. परिणामी डास, माश्या आणि भटक्या जनावरांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
सोयगाव नगरपंचायतीकडून शहरातील स्वच्छता कामकाजाचे कंत्राट ‘जय मा दुर्गा इंटरप्रायझेस’ या सिल्लोड येथील कंपनीकडे दिले आहे. दरमहा सुमारे साडेसहा लाख रुपयांचा खर्च या कामावर होत असूनही प्रत्यक्षात शहरातील स्वच्छता व्यवस्था कोलमडली आहे. कंपनीकडून वेळेवर पगार न मिळाल्याने पुरुष सफाई कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे दिवाळी सणही त्यांच्या अंधारात गेल्याची खंत कामगारांनी व्यक्त केली आहे.
शहरातील मुख्य रस्ते, बसस्थानक परिसर, जिल्हा परिषद शाळा आणि मेन रोड परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून असह्य दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. कचऱ्यावर भटके श्वान व वराह आपले अन्न शोधताना दिसत असून त्यामुळे वाहनचालकांना त्रास तसेच अपघातांची शक्यता वाढली आहे. ग्रामस्थांनी सांगितले की काही असामाजिक प्रवृत्तीचे लोक रात्री गावात भटके कुत्रे आणून सोडतात, ज्यामुळे रेबीसचा धोका वाढत आहे.
दरम्यान, दुकानदार व हॉटेल चालकांकडूनही रस्त्यावर कचरा टाकला जात असून त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दुर्गंधीच्या वातावरणात शाळेत ये-जा करावी लागत आहे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
नगरपंचायतीने ठिकठिकाणी कचराकुंड्या बसविलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिक सरसकट रस्त्यावरच कचरा फेकत आहेत. स्वच्छता यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याने मलेरिया, डेंग्यू, कॉलरा आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी संभाजी देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन रिसीव्ह केला नाही. नागरिकांनी मागणी केली आहे की, “वेळेवर पगार देऊन कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता पुन्हा सुरू करावी, बेजबाबदार ठेकेदारांवर कारवाई करावी आणि शहरभर कचराकुंड्या बसवाव्यात.”
नगरपंचायत आणि ठेकेदार यांच्यातील उदासीनतेचा फटका सध्या थेट नागरिकांना बसत असून, “प्रशासन आमच्या जीवाशी खेळत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
























