राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव येथे विविध उपक्रमांनी उत्साहात जयंती साजरी 
सोयगाव (प्रतिनिधी दत्तात्रय काटोले ) – राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव येथे विविध उपक्रमांनी उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या वतीने सोयगाव नगरपंचायतीच्या स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करून सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व पूजनाने झाली. सोयगाव येथील समाजसेवक तथा प्रबोधनकार यांनी गाडगे महाराजांची वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजप्रबोधन याबाबत प्रेरणादायी विचार देत विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी सोयगाव शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यरत नगरपंचायतीच्या स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी शालेय परिसर झाडून स्वच्छता अभियान राबवत गाडगे महाराजांना अभिवादन केले.
विद्यार्थ्यांनी गाडगे महाराजांचे आवडते ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे भजन सादर करून वातावरण भक्तिमय केले.
कार्यक्रमास केंद्र प्रमुख फिरोज तडवी, समाजसेवक दत्तू रोकडे, विष्णू मापारी, दादू काळे, सर्व स्वच्छता महिला कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेच मुख्याध्यापक किरणकुमार पाटील, सुरेखा चौधरी, पंकज रगडे, मंगला बोरसे, रामचंद्र महाकाळ, सविता पाटील, गणेश बाविस्कर, प्रतिभा कोळी, अकुश काळे, अनिल देसाई, विवेक महाजन, शुभम देसले, पुनम लाड आदी उपस्थित होते.

























