चोपडा महाविद्यालयात रंगली ‘स्वलिखीत काव्य लेखन स्पर्धा

चोपडा महाविद्यालयात रंगली ‘स्वलिखीत काव्य लेखन स्पर्धा      त्तम साहित्यकृतींच्या वाचनातून काव्य लेखनाची प्रेरणा मिळते’ -उदघाटक कविवर्य अशोक सोनवणे यांचे प्रतिपादन

चोपडा:येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र वाणिज्य महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वलिखित काव्यवाचन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेचे उदघाटन खानदेशातील सुप्रसिद्ध साहित्यिक कविवर्य श्री.अशोक निळकंठ सोनवणे यांच्या शुभहस्ते भारतमातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे, स्पर्धेचे परीक्षक उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, डॉ. किशोर पाठक, श्री. संदीप भास्कर पाटील, मार्गदर्शक डॉ. विनोद रायपुरे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री.बी.एस.हळपे, सौ.एम.टी.शिंदे तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेशकुमार वाघ आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी उदघाटनपर मनोगत व्यक्त करताना कविवर्य श्री.अशोक सोनवणे म्हणाले की, ‘काव्य लेखनासाठी आतला आवाज महत्त्वाचा असतो. अनेक उत्तम साहित्यकृतींच्या वाचनातून काव्य लेखनाची प्रेरणा मिळते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ऐकणे व साहित्याचे वाचन करणे गरजेचे आहे. सकारात्मक विचारातून सकारात्मक लेखनाची निर्मिती होते. काव्य लेखनामध्ये कवीने स्वतःला पूर्णपणे वाहून घ्यावे लागते. आपल्या लेखन शैलीत नेमकेपणा व कोरीवपणा शब्दांच्याद्वारे आला की, त्याची कविता बनते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आशयाची कविता कशी असते? हे कवितांच्या ओळी सादर करून समजावून दिले. शेतकऱ्यांची अवस्था कवितेतून ऐकविताना ते म्हणाले की,
*कोंब ज्वारी मक्याला आले
कापसाचे बोंड काळे झाले
देवा तुला वहावयाचे झेंडू
पार मातीमोल झाले*
आईची व्यथा कवितेतून मांडताना ते म्हणाले की,
*मांडीसाठी भांडणारी मुले मोठी झाली
शेवटी माय त्यांची इतरांच्या मांडीवर गेली*
समृद्ध अनुभव घेतल्याशिवाय उत्तम कविता लिहता येत नाही.अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे डोळसपणे निरीक्षण करून आलेले अनुभव कवितेत उमटायला हवे असा संदेश त्यांनी उपस्थितीत विद्यार्थ्यांना दिला.
या स्वलिखित काव्यवाचन स्पर्धेत चोपडा तालुक्यातील विविध महाविद्यालयातून जवळपास १५ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रवीण प्रवीण मधुकर कहानी याने ‘वेदना प्रेमात माझ्या’ ही गझल, धारपवार कृष्णा महेंद्र याने ‘जंगलतोड’ ही कविता, तडवी सोएब राजू याने ‘क्रांती दिनाची महती’, पाटील हर्षाली राजेंद्र हिने ‘आई म्हणजे काय असते?’ ही कविता, पाटील मोहिनी हिम्मत या विद्यार्थिनीने ‘राजे शिवछत्रपती’ ही कविता, पाटील राखी गोरख हिने ‘मी हुंडाबळी बोलतेय’ कविता, जोशी ज्ञानेश्वर अरुण यांने ‘शहीद जवान’, धनगर माया रवींद्र हिने ‘वतन के लाल’ ही कविता, पाटील कल्याणी रवींद्र हिने ‘आझादी’, पावरा अजय तुकाराम याने ‘मैत्री’ तसेच तिरमले गोपाल याने ‘होऊ सैनिक खरे’, विकास कोळी याने ‘खरी माझी सेवा’, राज कुंभार याने ‘परंतु तू हसत रहा’ तर कविता रामचंद्र माळी हिने ‘खरंच काहीतरी व्हायला पाहिजे’ इत्यादी सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांनी कवितांचे सादरीकरण केले.
उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, डॉ किशोर पाठक (पंकज महाविद्यालय, चोपडा आणि श्री. संदीप भास्कर पाटील यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कार्य केले.
या स्पर्धेत धारपवार कृष्णा महेंद्र (कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा) या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. धनगर माया रवींद्र (कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा) या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. तसेच तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पाटील राखी गोरख (पंकज महाविद्यालय, चोपडा) व माळी कविता रवींद्र (कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा) यांना विभागून देण्यात आले. यावेळी विजेत्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांना अनुक्रमे रु.३०७५/- रोख व प्रमाणपत्र, रु.२०७५/- रोख व प्रमाणपत्र आणि रु. १०७५/- रोख व प्रमाणपत्र अशी पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी म्हणाले की, ‘साहित्य हा जीवनाचा आरसा असून साहित्यिक समाजाचे वास्तव प्रतिबिंब आपल्या साहित्यात रेखाटतो. कवी नेहमी सजग असतो.अवतीभवतीच्या घडणाऱ्या घडामोडींचे अवलोकन करून सूक्ष्म निरीक्षणाच्याद्वारे आपली कविता रेखाटतो. ते काव्य लेखन अनुभव समृद्ध असे असते म्हणून सहभागी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रसिद्ध कवींचे कविता संग्रह वाचावेत व त्यातून शब्द समृद्धी करावी.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.एम.एल. भुसारे यांनी केले तर आभार श्री.जी.बी.बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.