मुलांच्या सर्वांगीण विकासात खेळांचे स्थान महत्त्वाचे — रावसाहेब पाटील

पाचोरा: “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास करते. खेळ आपल्याला उत्साह, उमेद आणि आरोग्य तर देतातच, शिवाय हार आणि जीत पचवण्याची शक्तीही निर्माण करतात,” असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद उर्दू शाळा, नगरदेवळा (ता. पाचोरा) येथे आयोजित सत्कार व मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. उर्दू माध्यमातून शिक्षण घेऊन थाई बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय व राज्य स्तरावर सुवर्णपदक मिळवणारा अबूजर मुबीन मिर्झा आणि ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत ७५ किलो वजन गटात आपले स्थान निर्माण करणारा मोहम्मद कैफ फरीद खान यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना रावसाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, अभ्यासासोबतच खेळांमध्ये हिरीरीने भाग घेऊन स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा आणि खेळाच्या माध्यमातून आपले करिअर घडवावे. तसेच, या शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी मांडले.अशफाक मजीद यांनी मान्यवरांचे आभार मानले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसीम गुलाम अहमद, उमर बेग, मुश्ताक खान, वसीम खान, फैजान खान, शोएब मिर्झा, तौसीफ शेख, वकार शेख, गणेश देशमुख, भय्या पाटील, जाहिद खाटीक, नासिर मण्यार, मोहसीन शेख, अकील मजीद, शेख शाहरुख.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अजहर शेख, शेख जावेद रहीम, रिजवान शेख, खलील शेख, नवीदा अन्सारी, सना अन्सारी, दिलारा सय्यद यांनी परिश्रम घेतले.
























