सोयगाव येथे विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोयगाव येथे विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 

 

सोयगाव : येथील अजंता व्हॅली इंग्लिश स्कूलमध्ये सोमवारी (ता. २२) विज्ञान प्रदर्शन व स्टुडंट्स लेड कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुशील जावळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रघुनाथ फुसे, संजय शाहपुरकर, संजय पाटील (गटशिक्षण कार्यालय), सुनील शेटे, भास्कर पिंगाळकर, डॉ. दिनकर पिंगाळकर, डॉ. स्वाती पिंगाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या संचालिका डॉ. स्वाती पिंगाळकर यांनी केले. सूत्रसंचालन सोनाली बागुल यांनी तर आभार प्रदर्शन पूजा दामोधर यांनी केले.

प्रास्ताविकात डॉ. स्वाती पिंगाळकर यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो, पुस्तकाबाहेरील ज्ञान मिळते, अभ्यासाविषयी आवड वाढते व जिज्ञासू वृत्तीला चालना मिळून आत्मविश्वास वाढतो, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. सुशील जावळे यांनी विज्ञानातील विविध शोधांचे सकारात्मक व नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांना सोप्या शब्दांत समजावून सांगितले.

या विज्ञान प्रदर्शनात नर्सरी ते इयत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी चांद्रयान, बुलडोझर, भूकंप सूचक यंत्र, एटीएम मशीन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर प्युरिफायर यांसह सुमारे १०० विविध प्रयोग व मॉडेल्स सादर करून उपस्थित पाहुणे व पालकांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका प्रियांका रोकडे, सीमा भामरे, शीतल काटोले, सोनाली बागुल, दीक्षा पवार, पूजा दामोधर, रुपाली गोल्हरे तसेच शिक्षक रामचंद्र लाडकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.