सोयगाव तालुक्यात तूर–हरभरा–मका पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

सोयगाव तालुक्यात तूर–हरभरा–मका पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

धुके, ढगाळ वातावरण आणि विजेच्या लपंडावामुळे शेतकरी संकटात

 

 

 

 

दत्तात्रय काटोले

 

सोयगाव परिसरात तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये तूर, हरभरा आणि मका पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. सकाळी पडणारे दाट धुके, सतत ढगाळ वातावरण आणि थंड–उबदार हवामानाचा लपंडाव यामुळे पिकांवर किडीचा हल्ला वाढला आहे. अतिवृष्टीचे संकट पार करून उभी राहिलेली तुरीची पिके आता किडीच्या प्रादुर्भावामुळे धोक्यात आली असून शेतकऱ्यांसमोर नैसर्गिक आणि प्रशासनाच्या दुहेरी संकटाची वेळ आली आहे.

 

वीजेच्या लपंडावामुळे तिहेरी फटका

 

दररोज भारनियमनाबरोबरच दोन–तीन तास अतिरिक्त विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी प्रचंड भटकंती करावी लागत आहे. अनेक गावांमध्ये वारंवार ट्रान्सफॉर्मर बिघाड, तारांना स्पर्श करणारी न तोडलेली झाडे आणि महावितरणाचा उदासीन कारभार यामुळे दोन–तीन दिवस वीज खंडित राहण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे तूर, मका, गहू व हरभरा पिकांची योग्यवेळी सिंचन व्यवस्था कोलमडली आहे.

 

सलग चार–पाच वर्षे नैसर्गिक संकटातून गेलेल्या शेतकऱ्यांना यंदा तुरीसह हरभऱ्यात चांगली वाढ दिसू लागली होती. परंतु वीजअभावी सिंचनात अडथळे येत असल्याने पिकांचा ‘तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची’ भीती व्यक्त होत आहे.

 

किडीचा प्रादुर्भाव वाढतोय — कृषी विभाग सतर्क

 

तूर आणि हरभरा पिकांवर पाने गुंडाळणारी मरूका अळी, घाटे अळी यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळत आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने कृषी विभागाने तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

 

ता.कृषी अधिकारी कासार साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार—

 

तुरीवरील अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्यास झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. झाडावरच्या अळ्या पोत्यावर पडून गोळा करता येतात व नष्ट करता येतात.

 

पाने गुंडाळणाऱ्या मरूका अळीच्या नियंत्रणासाठी

 

फ्लू-बेंडामाईड २० WG — ६ ग्रॅम

किंवा

 

नोवालूरॉन ५.२५% + इंडॉक्झाकार्ब ४.५% SC — १६ मिली

प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

हरभऱ्यावरील घाटे अळीवरील प्रभावी नियंत्रणासाठी

 

क्लोरअँट्रानिलीप्रोल (२० SC) — २.५ मिली

किंवा

 

इमामेक्टिन बेंझोएट (५% WG) — ३ ग्रॅम

प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

शेतकऱ्यांमध्ये संतापाचा सूर

 

किडीचा प्रादुर्भाव, विजेची कमतरता आणि प्रशासनाचा उदासीन कारभार—या तिहेरी संकटामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. “आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा, तसेच किडनियंत्रणासाठी मदत मिळावी,” अशी मागणी शेतकरी  करत आहेत.