परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल; पिकांवर मावा, तुडतुडे व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव

परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल; पिकांवर मावा, तुडतुडे व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव

 

 

सोयगाव तालुक्यात शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात; नुकसानग्रस्तांना अद्यापही मदतीची प्रतीक्षा

 

दत्तात्रय काटोले

 

सोयगाव :

परतीच्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे गणित बिघडवले आहे. नुकत्याच झालेल्या पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना थोडीफार मदतीची आशा निर्माण झाली होती; मात्र पुन्हा दमट व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मावा, तुडतुडे व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे.

 

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही पाणी साचलेले असून त्यामुळे पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः कापूस, तूर आणि मका पिकांवर मावा व कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. तुरीच्या फुलांवर काळा मावा बसल्याने फुले गळत असून शेतकऱ्यांचे मनोबल खचले आहे.

 

शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिके लावली असतानाच या पावसाने त्यांच्या आर्थिक संकटात आणखी भर टाकली आहे. अनेकांचे पंचनामे पूर्ण झाले असले तरी नुकसानभरपाई अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही, त्यामुळे शेतकरी सरकारकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत आहेत.

 

कृषी विभागाकडून निरीक्षणाचे दौरे सुरू असून, शेतकऱ्यांना फवारणी करून पिके वाचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, शेतात चिखल आणि पाणी साचल्याने अनेकांना फवारणी करणेही कठीण झाले आहे.

 

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “आधीच कर्जबाजारी आहोत, त्यात आता फवारणीसाठी आणखी खर्च करणे परवडत नाही. सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून ती थेट खात्यात जमा करावी.”

 

परतीच्या पावसामुळे कापसाच्या बोंडात पाणी शिरले असून कापूस ओली पडून गळत आहे, तर तुरीचे पीकही माव्याच्या प्रादुर्भावामुळे धोक्यात आले आहे. परिणामी शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः अंधारात गेली आहे.

 

स्थानिक शेतकरी संघटनांनी सरकारकडे मागणी केली आहे की, “फक्त पंचनामे नकोत, तर सरसकट आर्थिक मदत तात्काळ द्यावी, जेणेकरून शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकतो.