परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची आमदार अब्दुल सत्तार यांची पाहणी — शेतकऱ्यांना दिला धीर, लवकरच मिळणार भरपाई

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची आमदार अब्दुल सत्तार यांची पाहणी — शेतकऱ्यांना दिला धीर, लवकरच मिळणार भरपाई

 

 

 

दत्तात्रय काटोले सोयगाव (प्रतिनिधी) – तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे झालेल्या मोठ्या प्रमाणावरील शेती व फळबागांच्या नुकसानीची आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. फर्दापूर, सोयगाव, काकराळा परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला व शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

 

आमदार सत्तार म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असून पंचनामे झाले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या तीन दिवसांत नुकसानभरपाई जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.” तसेच ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी आहे त्यांनी तातडीने ती पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 

ते पुढे म्हणाले की, “नैसर्गिक आपत्तीत शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहे.”

 

परतीच्या पावसामुळे सोयगाव तालुक्यातील मक्याचे, कापसाचे तसेच फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापणी झालेल्या मक्याच्या कणसांना कोंब फुटले असून कापूस भिजून नासधूस झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आमदार सत्तार यांच्या उपस्थितीत प्रशासनाकडे मदतीची मागणी केली.

 

आमदार सत्तार यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना परिस्थितीची सविस्तर माहिती दिली असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत राज्य सरकारची सकारात्मक भूमिका आहे.”

 

या पाहणीदरम्यान नायब तहसीलदार संभाजी पाटील, गटविकास अधिकारी शिवाजी यमूलवाड, तालुका कृषी अधिकारी भारत कासार, तसेच जिल्हा बँक चेअरमन अर्जुन पा. गाढे, माजी सभापती रामदास पालोदकर, शिवसेना तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी, कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश आमदार सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.