मतदार यादीतील गोंधळाबाबत आम आदमी पक्षाची प्रशासनाकडे तक्रार

मतदार यादीतील गोंधळाबाबत आम आदमी पक्षाची प्रशासनाकडे तक्रार

 

भोकरदन (श्री महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये झालेल्या मोठ्या गोंधळाविरोधात आम आदमी पार्टी तर्फे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्यापूर्वीच सर्व त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी पक्षाने केली आहे.

 

पक्षाचे जिल्हा सचिव बोरसे गुरुजी यांनी सांगितले की, “दिनांक 13 मे 2025 रोजी संभाव्य त्रुटींविषयी प्रशासनाला पत्र देण्यात आले होते. मात्र त्यावर काहीही कारवाई न झाल्याने मतदार याद्यांमध्ये गंभीर चुका झाल्या आहेत. विशेषतः भोकरदन नगर परिषदेतील मतदारांची नावे चुकीच्या प्रभागांमध्ये नोंदवली गेली असून यामुळे अनेक मतदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.”

 

पक्षाने दिलेल्या निवेदनात खालील मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला आहे :

 

एकाच व्यक्तीचे नाव अनेक प्रभागांमध्ये नोंदवले गेले आहे.

 

बोगस नावे मतदार याद्यांमध्ये समाविष्ट झाल्याचे आढळून आले आहे.

 

काही राजकीय लोक व पक्षांच्या संगनमताने या चुका घडवून आणल्याचा आरोपही पक्षाने केला आहे.

 

“प्रत्यक्ष निवडणुकीची अधिसूचना निघण्याआधी बीएलओंमार्फत मतदार याद्या तपासून दुरुस्त करण्यात याव्यात. अन्यथा निवडणूक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. यावेळी आचारसंहितेचा भंग झाल्यास जबाबदारी प्रशासनाची राहील,” असा इशारा पक्षाने दिला आहे.

 

या प्रसंगी जिल्हा सचिव बोरसे गुरुजी, जिल्हा उपाध्यक्ष महेजाद खान, शहर उपाध्यक्ष फारुख भाई, युवा तालुका अध्यक्ष धनराज भारती, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भगवान पालकर यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.