शेवगाव एम आय डी सी आणि शहरासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा योजना मंजूर झाली,आता मायाताई मुंडेना नगराध्यक्ष करा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

शेवगाव एम आय डी सी आणि शहरासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा योजना मंजूर झाली,आता मायाताई मुंडेना नगराध्यक्ष करा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एम आय डी सी आणि शहरातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आता धनुष्यबाण चिन्ह असलेल्या मायाताई मुंडेना नगराध्यक्ष करा असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शेवगाव येथील खंडोबा मैदानावर झालेल्या जाहीर सभेत केले.ते शेवगाव नगरपरिषद निवडणूकीतील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. युवा नेते अरुण भाउ मुंढे यांनी प्रास्ताविकात आपल्या वर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे सांगितले.तर सौ. हर्षदाताई काकडे यांनी जनशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्यामुळे शिवसेनेचा विजय निश्चित होणार असल्याचे संकेत देत संपूर्ण दक्षिण नगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद दाखवून देवू असे सांगितले.या पार्श्वभूमीवर जनशक्ती मंचचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सौ हर्षदाताई काकडे यांनी जनशक्ती मंच हा पक्ष शिंदे शिवसेनेत विलीन करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मायाताई अरुण मुंडेना जाहीर पाठिंबा जाहीर केला.या काकडे दाम्पत्याच्या पक्ष प्रवेशामुळे शेवगाव तालुक्यातील राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना जाहीर सभेत फोन करून शेवगाव एम आय डी सी मंजूर करण्यासाठी चे आश्वासन दिले.तर सार्वजनिक पाणीपुरवठा योजना मंत्री गुलाबराव पाटील यांना फोन केला असता त्यांनी शेवगाव शहरासाठीची सार्वजनिक पाणीपुरवठा योजना नगरोत्थान या योजने अंतर्गत मंजूर करण्यात आल्याचे जाहीर केले.त्यामुळे शेवगाव तालुक्यातील जनतेने या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.काकडे मुंडे एकत्र आल्यामुळे शेवगाव तालुक्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद वाढली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची गुरुवारी रात्री होणारी सभा काही कारणास्तव रद्द झाल्यामुळे विरोधी गटात कुजबुज सुरु झाली होती.त्याला आता पुर्ण विराम मिळाला आहे.या जाहीर सभेसाठी नेवाशाचे शिंदे शिवसेनेचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे, संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे,अहिल्या नगरचे शिवसेनेचे माजी महापौर संभाजी कदम, जिल्हा अध्यक्ष बाबुशेठ टायरवाले,संपर्क प्रमुख संजीव भोर,जनशक्ती मंचचे महासचिव जगन्नाथ गावडे,पप्पू केदार, अशोक ढाकणे, अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे,सचिन जाधव यांच्या सह नगर परिषदेचे सर्व उमेदवार उपस्थित होते.मायाताई मुंडे यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत विजयी करा तुमच्या शेवगाव शहराचा विकास कामाद्वारे चेहरामोहरा बदलून टाकू असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले.खंडोबा माळावरील शिवसेनेच्या सभेने संपूर्ण शेवगाव शहर भगवे झाले होते.उपमुख्य मंत्र्याच्या या जाहीर सभेमुळे विरोधी गटात चांगलीच राजकीय खळबळ उडाली आहे.दोन्ही राष्ट्रवादी,भाजप,काॅंग्रेस मतदारांना आकर्षित करण्यासाठी काय उपाय योजना करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मत विभागणीचा फायदा नेमका कोणाला होणार यावर बरेच विजयाचे गणित अवलंबून आहे.