अहिल्यानगर येथील आर टी ओ अधिकारी गीता शेजवळ यांचा एजंट म्हणून काम करणारा खाजगी इसम इस्माईल पठाण यास अहमदनगर जिल्हा न्यायालया कडून जामीन मंजूर
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
अहिल्यानगर जिल्ह्यातील आर टी ओ चा खाजगी एजंट म्हणून काम करनाऱ्या इस्माईल पठाण यास न्यायालयाकडून सशर्त जामिन मंजूर करण्यात आला आहे. या बाबतची माहिती अशी की सदर गुन्ह्यातील फिर्यादी याचा सिमेंट वाहतूकीचा व्यवसाय आहे. सिमेंटने भरलेली गाडी अहिल्यानगर जिल्ह्यातून ओव्हरलोड घेऊन जाण्यासाठी आर टी ओ अधिकारी व सदर एजंट यांनी लाचेची मागणी केली असता फिर्यादी यांनी या संदर्भातील तक्रार पोलिस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे केली होती.त्यानुसार संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांनी दिनांक 24/09/2025 रोजी सापळा रचून सदर एजंट इस्माईल पठाण यास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते.त्यानुसार भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये या संदर्भात फिर्याद दाखल करून गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता.
सदर आरोपी इस्माईल पठाण यांच्या वतीने ॲडव्होकेट आसिफ लतिफ शेख यांनी जामिन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर जामिन अर्जावर न्यायालयात सुनावणी होऊन आरोपी तर्फे ॲडव्होकेट आसिफ लतिफ शेख यांनी जोरदार युक्तिवाद केला होता.त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश ए .एम.पाटील साहेब यांनी आरोपीचा जामिन अर्ज तात्काळ मंजूर केला आहे. ॲडव्होकेट आसिफ लतिफ शेख यांना ॲडव्होकेट आकाश अकोलकर व ॲडव्होकेट स्वाती ढमाळ यांचे मार्गदर्शन लाभले आहे. असिफ लतिफ शेख हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील रहिवासी असून त्यांचे वडील पाथर्डी न्यायालयात जेष्ठ विधिज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत.ते पाथर्डी न्यायालयात प्रॅक्टिस करीत आहेत.त्यांनी वडीलांचा वारसा अतिशय कुशलतेने सांभाळताना अतिशय कमी कालावधीत असिफ लतिफ शेख यांनी वकिली क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या कार्या बद्दल अहिल्या नगर जिल्ह्यातील वकिली क्षेत्रात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

























