‘लेखक हाच खरा राष्ट्राचा दागिना’- – प्रो.डॉ.फुला बागुल

‘लेखक हाच खरा राष्ट्राचा दागिना’- – प्रो.डॉ.फुला बागुल

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक तसेच शिरपूर येथील एस.पी.डी.एम. महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक प्रो.डॉ.फुला बागुल, कविवर्य अरविंद भामरे, उपप्राचार्य प्रा.डॉ. आर.एम.बागुल व उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.बी.सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, सौ.एम.टी.शिंदे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय डॉ.एम.एल.भुसारे यांनी करून दिला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कवी साहित्यिक व समीक्षक प्रो.डॉ.फुला बागुल म्हणाले की, ‘लेखक बनण्यासाठी संवेदनशील मनाची आवश्यकता असते. साहित्यिक जगात परिवर्तन घडू शकतो व आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. म्हणून लेखक हाच खरा राष्ट्राचा दागिना आहे. उत्तम साहित्य लेखनासाठी उत्तम पुस्तकांचे वाचन करणे गरजेचे आहे. मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य विकसित करून वाचनातून संस्कार करावेत. उत्तम उत्तम पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्यांनी करावे. यावेळी त्यांनी प्रथम वर्ष कला अभ्यासक्रमात नेमलेल्या त्यांच्या विज्ञानाचा सातबारा या कथेच्या निर्मिती मागील प्रेरणा, पार्श्वभूमी व आशयाचे स्पष्टीकरण केले तसेच विद्यार्थ्यांना त्याच्यातील मर्मस्थानांचा परिचय करून दिला.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना लेखकाला प्रत्यक्ष भेटण्याची उत्सुकता असते, ती पूर्ण करता यावी व त्यांच्या साहित्यावर सुसंवाद साधता यावा. लेखन प्रेरणा व भूमिका जाणून घेता याव्यात या उद्देशाने ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लेखक पात्रांच्या भूमिकेत शिरून समाजाच्या घटनांचे सूक्ष्म निरीक्षण करतो व साहित्य लिखाणाची प्रेरणा घेतो. आजच्या आधुनिक पिढीतील युवकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा, वाचन करून शब्द भांडार वाढवावे तरच व्यक्तिमत्व विकास होईल’.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एम.एल. भुसारे यांनी केले तर आभार एम.पी. सोनवणे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम.पी.राजपूत व सुनंदा नन्नवरे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू- भगिनी उपस्थित होते.