अतिवृष्टी अनुदान घोटाळा : पुन्हा एक संशयित अटकेत_आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई_

अतिवृष्टी अनुदान घोटाळा : पुन्हा एक संशयित अटकेत_आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई_

 

जालना, दि.१९ : (भोकरदन तालुका प्रतिनिधी)

जालना जिल्ह्यातील बहुचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एक संशयिताला अटक केली आहे. संशयिताचे नाव शिवाजी श्रीधर ढालके असून तो अंबड तहसील कार्यालयांतर्गत तलाठी म्हणून कार्यरत होता.

 

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या अनुदानाच्या वाटपात तब्बल २४ कोटी ९० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी २८ जणांविरुद्ध १९ ऑगस्ट रोजी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. यापूर्वी अंबडचे सहायक महसूल अधिकारी दिनकर जाधव याला अटक झाली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे.

 

या प्रकरणातील इतर २७ आरोपी फरार होते. यापैकीच ढालके अमरावती येथे लपल्याची माहिती तांत्रिक तपासातून मिळाल्याने आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि. १९) अमरावतीत कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.

 

ही कारवाई प्रभारी पोलिस उपअधीक्षक सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यासह अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रवींद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, पाठक, जयश्री निकम, निमा घनघाव व मंदा नाटकर यांनी सहभाग घेतला.

 

दरम्यान, या घोटाळ्यामुळे महसूल विभागातील दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला असून पंचनामे करण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.