हरभरा पिकाच्या संरक्षणासाठी कृषी विभाग सज्ज
घाटेअळी नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे कृषी अधिकारी भारत कासार यांचे आवाहन
सोयगाव | प्रतिनिधी : दत्तात्रय काटोले
सोयगाव तालुक्यासह परिसरात रब्बी हंगामातील महत्त्वाचे दाळवर्गीय पीक असलेल्या हरभरा, तसेच मका, भेंडी व गवार भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. सध्या ही पिके फुलावस्थेत असून, या निर्णायक टप्प्यावर योग्य कीड व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना उत्पादनात लक्षणीय वाढ साधता येणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी दिली.
हरभरा पिकावर प्रामुख्याने घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून, ही कीड फुले व घाटे खाऊन मोठे नुकसान करते. एकच अळी ३० ते ४० घाट्यांचे नुकसान करू शकते. त्यामुळे फुलावस्थेतील पिकावर विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे कृषी सहायक अधिकारी तेलंग्रे साहेब यांनी सांगितले.
घाटेअळी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन अत्यंत प्रभावी ठरत आहे. सुरुवातीच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी फायदेशीर असून, शेतात प्रति हेक्टर २० पक्षी स्थानके उभारल्यास अळ्यांची संख्या नैसर्गिकरित्या कमी होते.
ज्या शेतात आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे (१ ते २ अळ्या प्रति मीटर ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे), तेथे जैविक नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. (Helicoverpa NPV) फवारणीची शिफारस करण्यात आली आहे. ही फवारणी विशेषतः लहान अवस्थेतील अळ्यांवर प्रभावी ठरते.
गरज भासल्यास रासायनिक नियंत्रणासाठी
क्वीनाॅलफाॅस २५% – २० मिली
इमामेक्टिन बेंझोएट ५ एसजी – ३ ग्रॅम
क्लोरॅनटीनिलीप्रोल १८.५ एससी – २.५ मिली
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तालुका कृषी अधिकारी भारत कासार (सोयगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असून, योग्य उपाययोजना केल्यास हरभरा पिकाचे संरक्षण होऊन निश्चितच उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास कृषी सहायक अधिकारी तेलंग्रे साहेब यांनी व्यक्त केला आहे.

























