वरखेडी शेतजमिनीत विजेच्या धक्क्याने पाच जणांचा मृत्यू ; पुढील कार्यवाही सुरु

वरखेडी शेतजमिनीत विजेच्या धक्क्याने पाच जणांचा मृत्यू ; पुढील कार्यवाही सुरु

 

जळगाव दि. २० ऑगस्ट – एरंडोल तालुक्यातील मौजे वरखेडी येथील गट क्रमांक २१ मधील शेतात आज (दि. २० ऑगस्ट) दुपारी झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बंडू युवराज पाटील व अलकाबाई बंडू पाटील यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीत पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तारांचे कुंपण लावण्यात आले होते. या कुंपणाला विजप्रवाह सोडण्यात आलेला होता. संबंधित इसमांचा त्या तारेला स्पर्श झाल्यामुळे ही घटना घडली.

 

या दुर्घटनेत विकास रामलाल पावरा (३०), सुमन विकास पावरा (२५), पवन विकास पावरा (०४), कवल विकास पावरा (०३) व लिलाबाई जामसिंग पावरा (६०) यांचा मृत्यू झाला असून दुर्गा विकास पावरा (०२) ही मुलगी सुखरूप बचावली आहे.

 

मृतदेह जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. मृतक हे मध्यप्रदेशातील जि. बुरहानपूर, ता. खकणा येथील पो. ओसरणी गावचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

प्रशासनाकडून या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.