मढी येथे मानाच्या पाच कावडीच्या निशान भेटीने फुलोरबाग यात्रा उत्सव संपन्न

मढी येथे मानाच्या पाच कावडीच्या निशान भेटीने फुलोरबाग यात्रा उत्सव संपन्न !

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”/अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर) ‌ ‌संपुर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे मानाच्या पाच कावडीच्या निशान भेटीने फुलोरबाग यात्रा उत्सव संपन्न झाला. पैठण हुन पाणी भरल्या नंतर शेवगाव, अमरापूर, साकेगाव,हत्राळ,निवडुंगे मार्गे या कावडी साठ किलोमीटर अंतरावरील पायी प्रवास करून मढीकडे येतात. आणि फुलोरबागात विश्रांती घेतात.फुलोरबाग यात्रा उत्सवात पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, मढी,सुसरे,माळी बाभुळगाव,आणि पैठण या पाच गावांतील कावडीना प्रथम मान दिला जातो. फाल्गुन रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथ महाराज जेव्हा समाधिस्थ झाले त्यावेळी निवडुंगे रस्त्यावरील नदीकाठी विश्रांती साठी थांबले होते.म्हणून या ठिकाणी फुलोरबाग यात्रा भरते.रंगपंचमीला समाधिस्थ झाले आणि फाल्गुन अमावस्येला प्रकट झाले म्हणून या दिवसाला खुपचं महत्त्व प्राप्त झाले आहे.महाराष्ट्रासह, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आले होते.मढीकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते.वाहतुकी मुळे तिसगाव,निवडुंगे, धामणगाव,घाटशिरस, मायंबा गड या रस्त्यावर वाहनांच्या गर्दीमुळे दुतर्फा रांगा लागल्या होत्या. अमावस्येच्या दिवशी कानिफनाथ गडावरून आलेल्या मानाच्या घोड्यांची पालखी आणि फुलोरबागातून आलेल्या मानाच्या पाच कावडीच्या निशान भेटीचा अपुर्व क्षण पाहण्यासाठी भाविकांची येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.निशान भेटीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी पाचही निशान आपल्या खांद्यावर घेऊन गडावरील घोड्यांची आणि निशानाची भेट घडवून आणली.नंतर मानाच्या काठ्या सह सर्व कावडी वाजत गाजत गडावर गेल्या.लहान मुलांना कावडीच्या समोर झोपण्यासाठी सुवासिनी महिलांनी गर्दी केली होती. एकादशी ते अमावस्या या काळात हे कानिफनाथ मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करून देण्यात आले होते. पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी रणदिवे, सपोनी मुलगीर, सपोनी तांबे,पोसई जाधव,परीपोसई आगरकर, गोपनीय विभागाचे भगवान सानप,पो.हे.काॅं. दराडे,बडे, दळवी,तांदळे, एकनाथ बुधवंत,यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष बबनराव मरकड, विश्वस्त रविंद्र आरोळे, विलास मढीकर, शामराव मरकड, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, माजी अध्यक्ष सुधीर मरकड, माजी सरपंच देविदास मरकड हे आवर्जून उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार न घडता ही यात्रा शांततेत पार पडली.