अखेर वावी येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर मंजूर – आ. सत्यजीत तांबेंच्या प्रयत्नांना यश

अखेर वावी येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर मंजूर
– आ. सत्यजीत तांबेंच्या प्रयत्नांना यश
– तीस खाटांचे होणार ग्रामीण रुग्णालय
– नगर व नाशिक जिल्ह्यांमधील अपघाती मृत्यूच्या प्रमाणात होणार घट

प्रतिनिधी, नाशिक

नागरिक आणि उद्योग या दोहोंसाठी दळणवळणाच्या उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्यात महामार्गांचं विस्तीर्ण जाळं तयार केलं जात आहे. मात्र, महामार्गांवरील अपघातांमधील जखमींचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी कधी करणार, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी अधिवेशनात केली होती. तसेच याबाबत सततचा पाठपुरावा आ. तांबे करत होते. आता या मागणीला यश आले असून नाशिकमध्ये वावी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. तसेच सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. आता अहमदनगर व नाशिककरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

३० खाटांच्या या नियोजित ग्रामीण रुग्णालयासाठी शासन स्तरावरून स्वतंत्र पदनिर्मिती देखील केली जाणार आहे. राज्य सरकारच्या वतीने अपर सचिव कविता पिसे यांच्या सहीने आदेश शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणून वावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मंजुरी दिली. वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तीर्ण आवारात ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय साकारण्यात येईल. त्यासाठी जागा अधिग्रहण, नवीन इमारत बांधकाम व पदनिर्मितीबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अहमदनगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमधील अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर्सची निकडीची गरज आहे. काही महिन्यांपूर्वी पायवारी करणाऱ्या चार वारकऱ्यांना एका गाडीने चिरडल्याची घटना घडली होती. हे वारकरी जखमी अवस्थेत असताना त्यांना तातडीने उपाययोजना न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. परंतु, आता निष्पाप पादचाऱ्यांचा आणि प्रवाशांचा नाहक बळी जाणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वावी येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला हिरवा कंदिल दिला असून नाशिक-शिर्डी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळेल, अशी माहिती आ. सत्यजीत तांबे यांनी दिली.

चाळीस गावांमधील लोकांना मिळणार आरोग्य विषयक सुविधा!

सिन्नर तालुक्यातील वावी हे गाव सिन्नर-शिर्डी महामार्गावर वसले आहे. समृद्धी महामार्ग, नियोजित सुरत-चेन्नई एक्स्प्रेस वे, ओझर एअरपोर्ट ते शिर्डी एअरपोर्ट मार्गावर अपघात घडल्यास, तसेच परिसरातील सुमारे चाळीस गावांमधील सर्वसामान्य लोकांना आरोग्य विषयक सुविधा पुरवण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ट्रॉमा युनिट सुरू करण्याची आग्रही मागणी आमदार सत्यजीत तांबे यांची होती.