चोपडा महाविद्यालयात ‘युवा मॅरेथॉन स्पर्धा’ उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘युवा मॅरेथॉन स्पर्धा’ उत्साहात संपन्न

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयात
महात्मा गांधी शिक्षण मंडळ, संस्थेच्या वतीने दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता ‘राष्ट्रीय युवा दिनानिमित्त’ भव्य ‘युवा मॅरेथॉन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन चोपडा येथील चोपडा शहरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश पंढरीनाथ पाटील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. या स्पर्धेसाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी हे उपस्थित होते.या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे व चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश पंढरीनाथ पाटील, उपप्राचार्य एन.एस. कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे, जिमखाना क्रीडा समन्वयक एम.जी.पाटील,नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या करूणा चंदनशिव, समन्वयक डॉ. एस.ए.वाघ, रजिस्टर श्री.डी.एम.पाटील, क्रीडा संचालक डॉ. सौ.के. एस. क्षीरसागर आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘राजमाता जिजाऊ’ व ‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जयंती निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी आशिष सपकाळे व वैष्णवी पाटील या स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे व स्पर्धेचे उदघाटक डॉ.सुरेश पंढरीनाथ पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. ‘धावणे’ आणि ‘चालणे’ हा खरा उत्तम आरोग्याचा मूलमंत्र आहे म्हणून मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी ही संस्था व महाविद्यालय डॉक्टर आणि उत्तम खेळाडू घडविणारे माहेरघर आहे, अशा शब्दात संस्था व महाविद्यालयाचे कौतुक केले.
या मॅरेथॉन स्पर्धेत जवळपास १५० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटातून प्रथम-भावना जाधव, द्वितीय-कानन पाटील व तृतीय-नेहा चंदनशिव, पुरुष गटात प्रथम- कमलेश साळुंखे, द्वितीय- मोतीराम पावरा, तृतीय-गौरव चौधरी व उत्तेजनार्थ- पंकज सोनार त्याचप्रमाणे मुलांच्या गटात प्रथम- विशाल पारधी, द्वितीय-सोपान धनगर, तृतीय-सागर धनगर, उत्तेजनार्थ प्रथम- कुणाल धनगर, उत्तेजनार्थ द्वितीय-उमेश बागल त्याचप्रमाणे मुलींच्या गटात प्रथम- पल्लवी कोळी, द्वितीय-चेतना ठाकरे, तृतीय- विद्या बारेला व उत्तेजनार्थ-योगिता भोसले इत्यादी खेळाडूंनी पारितोषिके प्राप्त केली.या स्पर्धेतील मुले व मुलींच्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम -रुपये २१००/- रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक रुपये १५००/- रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी व तृतीय पारितोषिक रुपये १०००/- रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी अशी पारितोषिके देऊन विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्पर्धेच्या आयोजनाकामी प्रायोजक म्हणून जय हरी किचन ट्रॉली, अमळनेर, प्रशांत पब्लिकेशन, जळगाव व अथर्व पब्लिकेशन, जळगांव यांनी सहकार्य करून महत्वपूर्ण भूमिका बजावली.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी म्हणाले की, ‘मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय संधी उपलब्ध करून देते.त्याचबरोबर आरोग्य संवर्धनाचा देखील संदेश देते म्हणून अशा स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्पर्धा समन्वयक व क्रीडा संचालक डॉ.सौ.के.एस.क्षीरसागर यांनी केले तर आभार एन.सी.सी. प्रमुख डॉ.बी.एम.सपकाळ यांनी मानले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा समन्वयक व क्रीडा संचालक डॉ. सौ.के.एस. क्षीरसागर, अतुल पाटील, क्रीडा शिक्षक अमोल पाटील तसेच सर्व आयोजन समिती प्रमुख, सदस्य व प्राध्यापक बंधू-भगिनी यांनी अथक परिश्रम घेतले.या स्पर्धेप्रसंगी संस्थेच्या अंतर्गत विविध शाखांचे विद्यार्थी, खेळाडू, शिक्षक- शिक्षकेतर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते