मुलांना आयुष्यात ‘रीस्टार्ट’ करणं शिकवा! – ‘१२ फेल’ चित्रपटावरुन आ. सत्यजीत तांबेंचा सल्ला – प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ

मुलांना आयुष्यात ‘रीस्टार्ट’ करणं शिकवा!
– ‘१२ फेल’ चित्रपटावरुन आ. सत्यजीत तांबेंचा सल्ला
– प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ

प्रतिनिधी, जळगाव

मुलांनी निराशेच्या गर्तेतून बाहेर कसं यावं, यावर भाष्य करणारा ‘१२ फेल’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ज्या पालकांना आपल्या मुलांकडून खूप अपेक्षा असतात. त्यांच्यासाठी हा चित्रपट एक धडा आहे. त्यामुळे अशा प्रकारचे चित्रपट हे विद्यार्थ्यांना आवर्जून दाखवा आणि मुलांना आयुष्यात ‘रीस्टार्ट’ करायला शिकवा, असा सल्ला आमदार सत्यजीत तांबेंनी दिला.

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित आ. बं. मुलांच्या हायस्कूलच्यावतीने आयोजित स्व. मांगीलालजी गोवर्धनदास अग्रवाल स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरशालेय सामान्य प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात आ. तांबे बोलत होते.

सत्यजीत तांबे म्हणाले की, नुकताच छत्रपती संभाजीनगरला येत असताना विमानतळावर आयपीएस मनोज शर्मा यांची भेट घेतली. १२ वीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एखादा क्षण असा येतो. तो त्यांच संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. इथून पुढं फक्त कॉपी करुन पास होणाची परंपरा असलेल्या गावामध्ये तो एकटा मुलगा कॉपी न करता पास होतो. पुढे मेहनत घेऊन तो आयपीएस अधिकारी होतो, असे उत्तम उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे संस्थेने मुलांना असे प्रेरणादायी चित्रपट जरूर दाखवावे.

एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या प्रगतीत संस्था चालकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. नारायणराव अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी चाळीसगांव एज्युकेशन संस्थेच्या शैक्षणिक विकासासाठी जी काही भूमिका स्विकारली त्याचेच फलित आज या संस्थेच्या होत असलेल्या सर्वांगिण प्रगतीतून दिसून येत असल्याचे देखील आ. तांबे म्हणाले. याप्रसंगी, आ. मंगेश चव्हाण, नारायणदास अग्रवाल, योगेश अग्रवाल, रामकृष्ण पाटील, डॉ. विनोद कोतकर व प्रदीप अहिरराव आदींची उपस्थिती होती.

चौकट

चाळीसगांव दौरा असा संपन्न झाला

आमदार सत्यजीत तांबे शनिवारी जळगाव जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील प्रसिद्ध पाटणादेवी मंदिराचे दर्शन घेतले. तसेच रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांचे जन्मस्थान असलेल्या वालझिरी येथील प्राचीन मंदिरात भगवान महादेवाचे दर्शन घेतले. कृषिभूषण अरुण निकम यांची देखील भेट घेतली. पाटणा चाळीसगाव येथील आद्य गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या समाधी स्थळी भेट दिली. हिवाळी अधिवेशनानंतर त्यांचा मतदारसंघातील पहिला दौरा असून विविध घटकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, कार्यकर्ते व ग्रामस्थांशी संवाद साधला.