जिल्हा परिषद शाळा भोजे येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न
जिल्हा परिषद शाळा भोजे येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या निमित्ताने शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून, पुष्पगुच्छ देऊन व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी आकर्षक सजावट केलेल्या ट्रॅक्टरमधून नवागत विद्यार्थ्यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ट्रॅक्टरवरून निघालेल्या अनोख्या मिरवणुकीमध्ये विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मिरवणुकीमुळे गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे, यावर्षी इंग्लिश मिडीयम मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा भोजे येथे प्रवेश घेतल्याने पालकांमध्ये शाळेबाबत सकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर वाढता विश्वास दिसून येत असून, त्यामुळे शाळेच्या पटसंख्येतही वाढ झाली आहे.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सचिन पाटील, उपाध्यक्ष श्री. अमोल चौथे, सदस्य श्री. आबा पाटील, केंद्रप्रमुख श्री. स. ना. महाजन सर, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती पाटील मॅडम, श्री. समाधान पाटील सर, श्रीमती गायत्री पाटील मॅडम, श्री. स्वप्नील पाटील सर, श्री. दीपक चंदिले सर, श्री. जितेंद्र जगताप सर, श्री. तुषार पाटील सर आणि श्रीमती उज्वला सोनार यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री पाटील मॅडम यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती पाटील मॅडम यांनी केले, तर शाळेची यशोगाथा श्री. समाधान पाटील सर यांनी उपस्थितांसमोर मांडली. त्यांनी शाळेच्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व गुणवत्तापूर्ण उपक्रमांची माहिती देत पालकांना आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी प्रेरित केले.
या प्रवेशोत्सवामुळे नवागत विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्साह पाहता नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अतिशय उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली.





















