संत श्री.रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारक व आर्थिक विकास महामंडळाकडे शासनाचे दुर्लक्ष; राज्यभरातील बारी समाज बांधवात तीव्र नाराजी
भोकरदन: जिल्हा जालना (प्रतिनिधी- महेंद्र बेराड)
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी असलेल्या संत श्री. रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटला असला तरी अद्याप महामंडळाला भरीव आर्थिक निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील बारी समाज बांधवांमध्ये शासनाविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेगाव,जिल्हा बुलढाणा येथे अखिल भारतीय बारी समाज महासंघ आयोजित अखिल भारतीय बारी समाज मेळावा दिनांक,1 आक्टोंबर 2023 रोजी भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे श्री रमेशचंद्र घोलप, श्री अनिल हिस्सल सर यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर या महामंडळाची घोषणा विधानसभा अधिवेशनात करण्यात आली होती. समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व व्यावसायिक उन्नतीसाठी हे महामंडळ महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा समाजबांधवांनी व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्षात महामंडळाला पुरेसा निधी न मिळाल्याने युवकांसाठी रोजगार, उद्योग, व्यवसाय व स्वावलंबनाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या जात नसल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे.
तसेच देशभरातील बारी समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील प्रस्तावित संत श्री रूपलाल महाराज यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. महाराष्ट्रात इतर अनेक समाजांच्या महापुरुषांची भव्य-दिव्य स्मारके शासनाच्या माध्यमातून उभारण्यात आली असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र बारी समाजाच्या एकमेव राष्ट्रीय स्मारकाचे काम प्रशासकीय अडचणी, तांत्रिक कारणे आणि आर्थिक निधीअभावी रखडल्याचा आरोप समाजातून केला जात आहे.
या स्मारकाच्या कामामध्ये नेमक्या कोणत्या प्रशासकीय अडचणी निर्माण होत आहेत, कोणत्या स्तरावर फाईल अडकली आहे आणि यामागे “झारीतील शुक्राचार्य” कोण आहेत, याबाबत आता समाजात उघडपणे चर्चा सुरू झाली आहे. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवण्यात मग्न असल्याची भावना समाजबांधवांमध्ये तीव्र होत आहे.
दरम्यान, अखिल भारतीय बारी समाज महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी तसेच जालना जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने शासनाकडे ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत. अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील संत श्री रूपलाल महाराज यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी तातडीने भरीव आणि पुरेसा आर्थिक निधी उपलब्ध करून स्मारकाचे काम पूर्ण करावे व त्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याचबरोबर राष्ट्रसंत श्री रूपलाल महाराज बारी समाज आर्थिक विकास महामंडळाला किमान ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून समाजातील युवकांना रोजगार, उद्योग व व्यवसायासाठी प्रभावी योजनांचा लाभ मिळू शकेल, अशीही मागणी करण्यात आली आहे.
मराठवाडा, विदर्भ तसेच जळगाव-खान्देश परिसरात बारी समाजाची मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असून, शासनाने समाजाच्या भावना व मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बारी समाज वेगळी राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचा इशाराही समाजातील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. भारतीय बारी समाज नवनिर्माण संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय बारी समाज महासंघ भोकरदन तालुका उपाध्यक्ष श्री महेंद्र बेराड सर यांनी याबाबत कार्यालयासोबत ईमेल द्वारे निवेदन पाठवले असून सोशल मीडियावरही याबाबत आग्रही मागणी केली आहे.
























