वीज तारा खाली असल्याने शेतकऱ्याची भीती; महावितरणकडे तक्रार
सोयगाव, दत्तात्रय काटोले
सोयगाव दि .२१ (प्रतिनिधी) : गलवाडा शिवारातील गट क्रमांक ७ मधून गेलेल्या महावितरणच्या वीज तारा जमिनीपासून अत्यंत कमी उंचीवर असल्याने शेतातील मशागतीची कामे करणे धोकादायक बनल्याची तक्रार आमखेडा येथील शेतकरी कडूबा त्र्यबक ढगे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महावितरणच्या शाखा अभियंत्यांना निवेदन देत तारा उंच करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी शेतातून महावितरणची लाईन टाकण्यात आली होती. मात्र तारा टाकताना योग्य ती काळजी न घेतल्याने त्या जमिनीपासून अवघ्या पाच फूट उंचीवर आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर व इतर मशागतीची कामे करताना जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महावितरण अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने तारा उंच कराव्यात, अन्यथा भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

























