गलवाडा येथे शिवजयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान; शिवचरित्राने श्रोत्यांना भारावले
सोयगाव, ता .२२ : तालुक्यातील गलवाडा येथे शिवजयंतीनिमित्त (ता.२१) जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन आनंदा गरबड इंगळे यांनी केले. सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सुरज आगे यांनी प्रभावी शैलीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र उलगडून सांगत उपस्थितांना अक्षरशः भावूक केले.
व्याख्यानादरम्यान त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यातून हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी झाली, याचे सखोल विश्लेषण केले. त्यांच्या ओजस्वी वाणीमुळे अनेक श्रोते भारावून गेले, तर काहींच्या डोळ्यांत अश्रूही आले. शिवाजी महाराजांनी सर्व समाजघटकांना एकत्र आणत ‘अठरा पगड जातींचे मावळे’ घडवले, असे सांगत त्यांनी सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचा दाखला देत आत्महत्येसारखा मार्ग न स्वीकारता शिक्षण व संघर्षातून मार्ग काढण्याचे आवाहन करण्यात आले. कुटुंबात संस्कार रुजवणे, मुलांना संस्कृतीची शिकवण देणे आणि व्यसनांपासून दूर राहण्याचेही त्यांनी मार्गदर्शन केले.
आजच्या तरुणांनी मोबाईलचा अतिरेक टाळून व्यायामाला प्राधान्य द्यावे, अन्यथा आरोग्यावर परिणाम होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच अंधश्रद्धा व खोट्या बाबाबुवांच्या मागे लागू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी आनंदा इंगळे यांनी आभार मानले. यावेळी अनिल इंगळे, सुनील सैदाणे, दीपक सोनवणे, अक्षय औरंगे, ओम इंगळे, रमेश चक्के, यश देशमुख, ऋषिकेश देशमुख, निलेश इंगळे, रणवीर इंगळे, शुभम पाटील, गोपाल पाटील, रोहित देशमुख, विजय सोनवणे, योगेश इंगळे, आशुतोष पाटील, गोपाल मंडवे, विकास मंडवे, शिवानंद औरंगे, सुमित खीरडकर, ललित इंगळे आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.























