सोयगाव परिसरात अवकाळी पाऊस व गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

दत्तात्रय काटोले
सोयगाव, दि. १८ – तालुक्यात बुधवारी सायंकाळपासून अवकाळी पावसाने व गारपिटीने अक्षरशः रौद्ररूप धारण करत शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सायंकाळी चार वाजेपासून आकाशात ढगांचा गडगडाट सुरू होता. त्यानंतर रात्री सात वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह गारपिटीला सुरुवात झाली आणि उशिरापर्यंत मुसळधार पाऊस कोसळत राहिला.
या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील जरंडी, ककराळा, बहुलखेडा, सोयगाव, फर्दापूर, जामठी आदी गावांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका, ज्वारी, बाजरी व सर्वात मोठे नुकसान पानामळे नागवेली मोठे क्षेत्र असल्यामुळे पाणमळ्याचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच भाजीपाला पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. काढणीसाठी तयार असलेला माल निसर्गाच्या या तडाख्यात वाहून गेला असून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरले नाही.
आधीच बाजारात शेतमालाला योग्य दर मिळत नसताना या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर घातली आहे. मोठ्या आशेने उभे केलेले पीक एका रात्रीत नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मार्च महिन्यात असा पाऊस आणि गारपीट पाहायला मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकही चकित झाले आहेत. शहरातही ठिकठिकाणी पाणी साचून रस्त्यांवरून पाण्याचे प्रवाह वाहताना दिसत होते.
दरम्यान, प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
संध्याकाळी पाऊस सुरू होतात लाईट गायब झाली आणि आजच नसून दररोज संध्याकाळी लाईट जाते पाऊस असला तरी जाते नसला तरी जाते लाईटचा का जाते मागील दोन दिवस सतत लाईट जातो गेली असली याचं कारण काही अद्याप करू शकले नाही लाईट जाते का असी चर्चा पूर्ण गावकरी मंडळी करत आहेत.
























