जि.प. शाळा कोकडी तांडा येथे ‘हिंद दी चादर’ उपक्रम उत्साहात संपन्न
कोकडी तांडा (ता. पाचोरा) – जिल्हा परिषद शाळा कोकडी तांडा येथे शासनाच्या निर्देशानुसार गुरु तेगबहादुर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणारा ‘हिंद दी चादर’ हा विशेष उपक्रम मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच गायन स्पर्धा यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले ज्ञान, वक्तृत्व आणि कलागुण सादर केले. संपूर्ण कार्यक्रमाची माहिती तसेच फोटो व व्हिडिओ लिंक शाळेच्या अधिकृत माध्यमांवर अपलोड करण्यात आली आहे.
स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळेतील १२ विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पाचोरा गटशिक्षणाधिकारी आदरणीय विजय पवार साहेब, केंद्रप्रमुख शांताराम वानखेडे, शाळेचे मुख्याध्यापक किसन सूर्यवंशी, तसेच शिक्षक राजू पटेल व देविदास पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षकांनी गुरु तेगबहादुर यांच्या त्याग, बलिदान व धार्मिक सहिष्णुतेच्या संदेशावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. शासनाच्या आदेशानुसार अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
























