गुरुकुल विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांनी शिवप्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहात पाचोरा येथील शिवरॅलीत सक्रिय सहभाग
दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गुरुकुल विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांनी शिवप्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहात पाचोरा येथील शिवरॅलीत सक्रिय सहभाग नोंदविला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवप्रतिमेचे पूजन सुरू असताना गुरुकुलच्या विद्यार्थिनी अन्वी सानप हिला शिवाजी महाराजांचे पाळणा गीत सादर करण्याची संधी मिळाली. तिच्या सुरेल गायनाने उपस्थितांचे मन जिंकले.
यानंतर ढोल-ताशांच्या गजरात गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार पारंपरिक वेशभूषेत लेझीम व लाठी-काठी प्रात्यक्षिक सादर करत सर्वांचे लक्ष वेधले. शिवरॅलीची सांगता झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण जीवनावर भाष्य करत प्रभावी वक्तृत्व सादर केले.
या आनंदमय सोहळ्यात सन्माननीय व्यासपीठावर माननीय आमदार साहेबांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तसेच शाळेचे प्राचार्य श्री. प्रेम शामनाणी सर यांना महाराजांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.





















