Home महाराष्ट्र सोयगाव तालुक्यात ६८.६० टक्के मतदान; ६०,१९८ मतदारांनी बजावला हक्क “३७ उमेदवारांचे भवितव्य...

सोयगाव तालुक्यात ६८.६० टक्के मतदान; ६०,१९८ मतदारांनी बजावला हक्क “३७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत” 

सोयगाव तालुक्यात ६८.६० टक्के मतदान; ६०,१९८ मतदारांनी बजावला हक्क “३७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत”

 

 

 

सोयगाव / प्रतिनिधी :दत्तात्रय काटोले

 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सोयगाव तालुक्यात उत्स्फूर्त मतदान झाले. तालुक्यातील तीन गट व सहा गणांसाठी एकूण ११३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ८७,७४७ मतदारांपैकी ६०,१९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तालुक्यात ६८.६० टक्के मतदान नोंदवले गेले.

 

दुपारी साडे तीन वाजेपर्यंत केवळ ५२.४० टक्के मतदान झाले होते. सकाळी मतदान केंद्रांवर चांगली गर्दी दिसून आली, मात्र दुपारच्या सत्रात काही काळ शुकशुकाट जाणवत होता. सायंकाळच्या वेळेत मात्र पुन्हा मतदारांनी मतदान केंद्रांकडे धाव घेतल्याने टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली.

 

या निवडणुकीत तीन गटांसाठी ११ महिला उमेदवार, तर सहा गणांसाठी २६ उमेदवार असे एकूण ३७ उमेदवारांचे भवितव्य शनिवारी मतपेटीत बंद झाले.

 

दरम्यान, गलवाडा येथील मतदान केंद्रावर दुपारी अचानक ईव्हीएम मशीन बंद पडल्याने सुमारे अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे काही मतदारांना मतदान न करता घरी परत जावे लागले. अर्ध्या तासानंतर मशीन सुरळीत सुरू झाल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र या अडथळ्यामुळे गलवाडा केंद्रावर सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी येथे मतदान प्रक्रिया सुमारे एक तास उशिरा पार पडली.

 

तालुक्यातील काही मतदान केंद्रांवर मतदार यादीत नावे सापडत नसल्याने मतदारांची तारांबळ उडाल्याचे प्रकार घडले. तसेच काही ठिकाणी मजूर वर्ग सायंकाळी उशिरा मतदान केंद्रावर पोहोचल्यामुळे मतदानाची संधी गमावल्याच्या तक्रारीही ऐकायला मिळाल्या.

 

तथापि, किरकोळ प्रकार वगळता तालुक्यातील सर्व ११३ मतदान केंद्रांवर शांततेत आणि सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली, अशी माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली.

Don`t copy text!