चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रीयस्तरावरील प्रत्यक्ष रोबोट बनवण्याची कार्यशाळा’ उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रीयस्तरावरील प्रत्यक्ष रोबोट बनवण्याची कार्यशाळा’ उत्साहात संपन्न

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभाग तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव याच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ सप्टेंबर, २०२३ रोजी *राष्ट्रीयस्तरावरील आरडिनो कंट्रोलर बोर्डपासून रोबोट बनविण्यासाठीच्या कार्यशाळेचे* आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते. या कार्यशाळेप्रसंगी व्यासपीठावर शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. बोरसे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य व इलेक्ट्रोनिक्स विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ. ए. एल. चौधरी, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस.ए. वाघ आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना उपप्राचार्य प्रा. डॉ.ए.एल.चौधरी म्हणाले की, ‘देशाच्या विकासासाठी नवनवीन शोध लागत असलेल्या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. प्रत्येक क्षेत्रात स्वयंचलित यंत्राचा वापर वाढला आहे. त्यामुळे रोबोटिक्स हा विषय आत्मसात करणे गरजेचे आहे. रोबोट विषयी प्राथमिक माहिती व त्याचे बनविण्याचे तंत्रज्ञान अवगत व्हावे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करण्यावर आणि कौशल्ये वाढविण्यावर भर दिला आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना काळाची गरज ओळखून आता वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट्स बनवता आले पाहिजे. चोपडा महाविद्यालय हे क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एकमेव असे महाविद्यालय आहे की, जिथे आरडिनो तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट्स बनवण्याविषयीच्या कार्यशाळेचे आयोजन मागील तीन वर्षांपासून सतत केले जात आहे आणि त्याचा फायदा शेकडो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत घेतला आहे.
यावेळी प्राचार्य व्ही. एन. बोरसे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याकरिता तांत्रिक कौशल्य वाढविण्यास प्रोत्साहित केले. यावेळी ते म्हणाले की, ‘आज जगात काय सुरु आहे ते प्रत्येक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना माहिती असणे गरजेचे आहे आणि स्वःताला अद्यावत ठेवत आपल्यातील कौशल्ये विकास करण्याची गरज आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी आपल्यातील संशोधन वृत्ती वाढवावी व त्याचा वापर समाजाचे भले करण्यासाठी करावा. आज रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.) चा जमाना आहे, त्यामुळे त्यामुळे माणसाला आधी अशक्य वाटणारी कामे सुद्धा रोबोटच्या साह्याने सहजरित्या आपण पार पाडू शकतो. विद्यार्थ्यांना आता नवीन तंत्रज्ञानचा वापर करून वेगवेगळे रोजगार शोधण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना आयुष्यात यश प्राप्तीसाठी कठीण परिश्रमाशिवाय पर्याय नाही’, असे सांगत विद्यार्थ्यांना कार्यशाळेचा पूर्ण फायदा घेण्यास प्रेरित केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विभागाचे कौतुक करून कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात विभागातील सहयोगी प्रा. डॉ. के. डी. गायकवाड यांनी आरडीनो बोर्ड विषयी आणि त्याच्याशी निगडीत वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल विस्तृत माहिती दिली. दुसऱ्या सत्रात विभागातील सहायक प्रा. डॉ. एल. बी. पटले यांनी आरडीनो तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध प्रकारचे रोबोट कसे बनवायचे तसेच रोबोटच्या साह्याने विविध इलेक्ट्रोनिक्स उपकरणे कशी नियंत्रित करायची यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पूर्ण दिवस विद्यार्थ्यांनी स्वतः प्रत्यक्ष वेगवेगळे रोबोट्स तयार करून त्याची उत्स्फुर्तपणे चाचणी केली. सदर कार्यशाळेत देशातील विविध विद्यापीठ अतंर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदविला.
या कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी सहभागी निवडक विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी आपले मनोगत करतांना ‘सदर कार्यशाळेमुळे आम्हाला रोबोट तयार करण्याची संधी मिळाली व त्यामुळे तंत्रज्ञानाच्या नवीन क्षेत्रात व नवीन संधी याविषयी मार्गदर्शन मिळाले व अशा प्रकारच्या कार्यशाळा दरवर्षी चोपडा महाविद्यालयाने आयोजित कराव्यात’ अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहा.प्रा. पूनम उ. गाडगीळ यांनी केले तर आभार सहाय्यक प्रा. निशा पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभागातील प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी हेमंत कन्हैये, धीरज राठोड व व्ही.एम. शुक्ल तसेच विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.