Home महाराष्ट्र दिव्यांग उमेदवार जखमी; निवडणूक विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

दिव्यांग उमेदवार जखमी; निवडणूक विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

दिव्यांग उमेदवार जखमी; निवडणूक विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

 

 

आमखेडा गटातील बसपाच्या महिला उमेदवाराचा मतदान केंद्रावर अपघात

सोयगाव | प्रतिनिधी दत्तात्रय काटोले

सोयगाव तालुक्यातील आमखेडा जिल्हा परिषद गटाच्या बहुजन समाज पक्षाच्या दिव्यांग महिला उमेदवार उर्मिला संदीप इंगळे या मतदानासाठी गेल्या असता मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा नसल्यामुळे पडून जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेमुळे निवडणूक विभागाच्या नियोजनाचा गंभीर अभाव समोर आला असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आमखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ०२ येथे सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. दिव्यांग असलेल्या उर्मिला इंगळे मतदानासाठी मतदान केंद्रावर गेल्या असता तेथे व्हीलचेअरची कोणतीही व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले. कुबड्यांच्या सहाय्याने मतदान केंद्रात जात असताना कुबडी सरकल्याने त्या जमिनीवर कोसळल्या व जखमी झाल्या.

घटनेनंतर त्यांना तातडीने सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनाजी खंदारे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून विश्रांतीचा सल्ला दिला. मात्र या अपघातामुळे इंगळे यांना इतर मतदान केंद्रांवर भेट देणे अशक्य झाले आहे.

या घटनेमुळे दिव्यांग मतदार व उमेदवारांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यात निवडणूक प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. वरिष्ठ अधिकारी याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया

“मी दिव्यांग महिला असूनही प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. इतर मतदान केंद्रांना भेट देण्यासाठी लवकर मतदान करण्याच्या उद्देशाने गेले होते. मात्र मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी कोणतीही सुविधा नव्हती. त्यामुळे माझ्यावर हा प्रसंग ओढावला. या घटनेमुळे मला प्रचार करता आला नाही. मला न्याय मिळावा यासाठी पोलिस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल करणार आहे.”

— उर्मिला संदीप इंगळे, बसपा उमेदवार, आमखेडा गट

Don`t copy text!