मोबाईलवर APK फाईल पाठवून २ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांनी ३ दिवसांत रक्कम जप्त केली
दत्तात्रय काटोले सोयगाव प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण), दि. २१ जानेवारी २०२६ :
क्रेडिट कार्ड इन्शुरन्सच्या नावाखाली मोबाईलवर APK फाईल पाठवून तब्बल २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत संपूर्ण रक्कम होल्ड करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
दि. १७ जानेवारी २०२५ रोजी एमएसईबीमध्ये कार्यरत असलेले श्री. सीताराम रामेश्वर राठोड यांना अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. कॉल करणाऱ्याने स्वतःला एसबीआय क्रेडिट कार्ड प्रतिनिधी असल्याचे सांगून कार्डचे इन्शुरन्स करायचे असल्याचे भासवले. त्यानंतर SBICREDITCARD.APK नावाची APK फाईल मोबाईलवर पाठवून ती इन्स्टॉल करण्यास सांगितले.
फसवणूक करणाऱ्यांनी राठोड यांचा विश्वास संपादन करून क्रेडिट कार्ड क्रमांक व CVV नंबर मिळवला. काही क्षणांतच त्यांच्या मोबाईलवर ४ वेळा प्रत्येकी ४९,९९९ रुपये अशा एकूण १,९९,९९६ रुपये (सुमारे २ लाख) क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट झाल्याचे SMS आले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ सायबर पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे संपर्क साधला.
सायबर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून संबंधित बँका, पेमेंट गेटवे आणि सेवा पुरवठादारांशी समन्वय साधला. तपासात सदर रक्कम तेलंगणा राज्यातील एका कंपनीकडे सर्व्हिस पेमेंट म्हणून वळती झाल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलिसांनी एसबीआय क्रेडिट कार्ड, रेझरपे व संबंधित ट्रान्झॅक्शन एजन्सींशी संपर्क साधून अवघ्या तीन दिवसांत संपूर्ण रक्कम होल्ड करण्यात यश मिळवले.
ही माहिती तक्रारदाराला देण्यात आल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सायबर पोलिसांच्या तत्परतेबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी नागरिकांना आवाहन केले की,
क्रेडिट कार्ड अॅक्टिव्हेशन, इन्शुरन्स, क्रेडिट लिमिट वाढवणे यासाठी येणाऱ्या अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवू नये. अशा कॉल्सना त्वरित डिसकनेक्ट करून फसवणूक झाली असो किंवा नसो, १९३० या सायबर फ्रॉड हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, निशा बनसोड तसेच कैलास कामठे, संतोष तांदळे, दत्ता तरटे, योगेश मोईम, गणेश घोरपडे, सविता जायभाये, मुकेश वाघ, राजेश राठोड, शीतल खंडागळे व रुपाली जाधव यांनी केली.

























