तांड्यावरचा मुलगा बनला डॉक्टर वरखेडी तांड्याच्या “शालिक राठोड” यांचा प्रेरणादायक प्रवास
सोयगाव (ता. प्रतिनिधी) – “जिद्द असेल तर वाट सापडतेच” हे विधान खरं करत वरखेडी तांड्याच्या डॉ. शालिक फुलाबाई मोतीलाल राठोड यांनी आपल्या नावासोबत गावाचेही नाव उज्वल केले आहे. बी.ए.यम.एस (BAMS) अंतिम वर्षाच्या परीक्षेत यश मिळवत ते गावाचे पहिले पदवीधर डॉक्टर ठरले आहेत.
डॉ. राठोड यांचा शिक्षण प्रवास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत असलेल्या आदित्य आयुर्वेद कॉलेज अँड रिसर्च सेंटर, बीड येथे सुरू होता. पाच वर्षांचा कठोर परिश्रमाचा प्रवास नुकताच यशस्वीरीत्या पूर्ण करत त्यांनी डॉक्टर ही उपाधी प्राप्त केली आहे.
शेतकरी कुटुंबातून आलेले डॉ. शालिक हे श्री. मोतीलाल झब्बु राठोड, रा. वरखेडी बु., ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर यांचे सुपुत्र आहेत. अत्यंत सामान्य पार्श्वभूमी, आर्थिक अडचणी, आणि मर्यादित साधनांमधून त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण करत इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
डॉ. शालिक यांच्या या यशामुळे गावात आणि तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, सर्व समाजबांधवांकडून त्यांचे भरघोस अभिनंदन केले जात आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, अनेकांना त्यांच्या यशाने नवी प्रेरणा मिळाली आहे.
डॉ. राठोड यांचे पुढील उद्दिष्ट ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी कार्य करण्याचे असून, त्यांनी समाजासाठी काहीतरी देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.